वरोरा :- येथील हिरालाल लोया विद्यालयात दिनांक २५ ते २७ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पार पडलेल्या तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये पी. एम. श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. या प्रदर्शनीत सादर झालेल्या एकूण ८३ प्रतिकृतींमधून आनंदवन शाळेच्या प्रतिकृतीने द्वितीय क्रमांक पटकावत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत इयत्ता ८ वी मधील नेहाल भालचंद्र चौखे, आदिती नन्नावरे व ईश्वरी श्रीकांत बोथले या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कल्पकतेचे व सादरीकरणाचे परीक्षकांसह मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक नगाजी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्यगण आणि शिक्षकवृंदांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आनंदवन परिसरातून या यशाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.





