13 November 2026News Website

राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ९ खेळाडूंची धडाकेबाज निवड!

वरोरा :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे आयोजित २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेचे तिकीट पक्के केले आहे. वर्धा येथे पार पडलेल्या या स्पर्धेतून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या एकूण ९ खेळाडूंची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १९ व २० नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा रंगणार आहे.विभागस्तरीय स्पर्धेत अटीतटीच्या लढती देत चंद्रपूर जिल्ह्याचा डंका वाजवणाऱ्या या ९ गुणी खेळाडूंनी आपापल्या वयोगट आणि वजनगटात अव्वल स्थान पटकावत ही गौरवशाली कामगिरी केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र खेळाडूंचे कौतुक होत आहे.



राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू खालीलप्रमाणे आहेत 

१४ वर्षांखालील मुली गट  :- कु. श्रीजा सुचीत सहारे (४६ किग्रॅ. वजनगट) – सेंट अॅन्स हायस्कूल, मूल, जि. चंद्रपूर

कु. परी प्रभाकर मांदाडे (५०+ किग्रॅ. वजनगट) – सेंट अँनिस हायस्कूल, मूल, जि. चंद्रपूर

१७ वर्षांखालील मुली गट :- कु. किरण मनोहर गोचे (३२ किग्रॅ. वजनगट) – दिशा स्कूल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निंग, वरोरा, जि. चंद्रपूर

१९ वर्षांखालील मुली गट :- कु. सानिया राजेश आवारी (६४ किग्रॅ. वजनगट) – दिशा सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स ज्युनियर कॉलेज, वरोरा, जि. चंद्रपूर

१४ वर्षांखालील मुले गट :- नयन प्रविण रामटेके (५५ किग्रॅ. वजनगट) – बी. जे. एम. कार्मेल अकादमी, चंद्रपूर

१७ वर्षांखालील मुले गट :- 1) रितीक श्रीकृष्ण धवने (३५ किग्रॅ. वजनगट) – लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा, जि. चंद्रपूर 2) मनिष मनोज शिंदे (६२ किग्रॅ. वजनगट) – मातोश्री अकॅडमी एक्सपेरीमेंटल स्कूल, चंद्रपूर

१९ वर्षांखालील मुले गट :- 1) निहाल शोडानन दोहतरे (४५ किग्रॅ. वजनगट) – जनता महाविद्यालय, चंद्रपूर 2) आर्यन मनोज शिंदे (७४ किग्रॅ. वजनगट) – डॉ. खत्री कनिष्ठ महाविद्यालय, तुकुम, चंद्रपूर

स्पर्धेचे वेळापत्रक व महत्त्वाच्या सूचना :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा चे क्रीडा अधिकारी तथा स्पर्धा संयोजक अनिल निमगडे यांनी सर्व पात्र खेळाडूंना स्पर्धेस उपस्थित राहण्याबाबत अधिकृत पत्र जारी केले आहे. त्यानुसार, मुलींच्या गटातील खेळाडूंनी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता स्पर्धा स्थळी उपस्थित राहावे; सायंकाळी ५.०० वाजता कागदपत्र पडताळणी व वजन होईल आणि १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होईल. तर मुलांच्या गटातील खेळाडूंनी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता उपस्थित राहून ५.०० वाजता कागदपत्र पडताळणी व वजन प्रक्रिया पूर्ण करायची असून २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता स्पर्धेस प्रारंभ होईल. सर्व खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे करण्यात आली आहे.या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व पात्र खेळाडू, त्यांचे पालक, संबंधित शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन केले जात असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

अभिषेक किशोर भागडे