नवी दिल्ली / चंद्रपूर :- काँग्रेसच्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर काँग्रेसच्या अंतर्गत गोटातही चर्चांना उधाण आले आहे. हा व्हिडिओ नेमका कोणी एडिट करून पसरवला, यामागे पक्षातील अंतर्गत राजकारण आहे का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
नेमके प्रकरण काय :- व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ १ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या इंडिया आघाडीच्या महामोर्चादरम्यानचा असल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनादरम्यान प्रवासासाठी वापरलेल्या बसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड एकत्र बसल्या होत्या. यावेळी बसमध्ये केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. याच दरम्यान, खासदार श्यामकुमार बर्वे यांनी हसतमुखाने प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हलकेच चपत मारल्याचे या काही सेकंदांच्या क्लिपमध्ये दिसत आहे.
मूळ व्हिडिओ कापून व्हायरल केल्याचा संशय :- मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील आंदोलनाचा आणि घोषणाबाजीचा संपूर्ण व्हिडिओ धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला होता. मात्र, मूळ व्हिडिओतील आंदोलनाचा आणि घोषणाबाजीचा भाग वगळून केवळ बर्वे आणि धानोरकर यांच्यातील हा काही सेकंदांचा हलकाफुलका प्रसंगच कापून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. संपूर्ण व्हिडिओ समोर न आणता फक्त ठराविक भागच पसरवल्यामुळे यामागे कोणाचातरी विशिष्ट हेतू असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीचा संबंध :- काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरल क्लिपमागे पक्षांतर्गत पदाच्या शर्यतीचे राजकारण असल्याची कुजबुज सुरू आहे. सध्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुनीता गावंडे यांच्याकडे आहे. मात्र, या पदासाठी प्रतिभा धानोरकर यांचेही नाव चर्चेत होते आणि त्यासाठी दिल्ली दरबारी जोरदार लॉबिंग सुरू होते. अशातच नेमका हा व्हिडिओ समोर आल्याने हा निव्वळ योगायोग आहे की धानोरकर यांना या शर्यतीतून बाजूला सारण्यासाठी खेळलेला राजकीय डाव, अशी चर्चा पक्षात रंगली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत काही नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापर्यंत तक्रार पोहोचवल्याचेही बोलले जात आहे. या क्लिपमागे नेमका कोणाचा हात आहे आणि या प्रकरणामुळे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण कोणते नवे वळण घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





