वरोरा :- शहरातील नेताजी वॉर्ड येथील देवांगण भागातील श्री हनुमान मंदिराच्या विकासकामांसाठी श्री हनुमान सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करणदादा देवतळे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या या सदिच्छा भेटीत पदाधिकाऱ्यांनी आमदार देवतळे यांना पुष्पगुच्छ देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर मंदिराच्या विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा केली. मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने भाविकांच्या सोयीसाठी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा उभारणे गरजेचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
💥 निवेदनातील प्रमुख मागण्या 💥
- मंदिर परिसरातील स्टेजवर स्लॅब किंवा टिनाचे शेड उभारणे.
- मंदिराशेजारील जोत्यावर पुजाऱ्यांसाठी निवासस्थान बांधणे.
- जीर्ण झालेल्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे.
- मंदिरात नवीन स्वच्छतागृह व स्वतंत्र नळजोडणीची व्यवस्था करणे.
- मंदिरासमोरील मोकळ्या जागेचे सुशोभिकीकरण व विकास करणे.
आमदार करणदादा देवतळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत सर्व कामांची माहिती जाणून घेतली. तसेच, निवेदनातील विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी श्री हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष गजानन पुरकर, सचिव मनोहर स्वामी, उपाध्यक्ष सुरेश स्वामी आणि कोषाध्यक्ष डॉ. प्रकाश कोटेचा प्रामुख्याने उपस्थित होते.





