6 November 2026News Website

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! राष्ट्रीय एकता दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ६ युवकांची निवड

एकता नगर (गुजरात) ३१ ऑक्टोबर २०२६ :-भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील युवकांची निवड झाली आहे. Youth Socialgram Foundation च्या माध्यमातून झालेल्या निवड प्रक्रियेत या युवकांना राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, देशभरातील विविध राज्यांतील मान्यवर, कलाकार आणि युवक या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.



💥 दोन विशेष संकल्पनांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व💥

या राष्ट्रीय सोहळ्यात सादर होणाऱ्या ‘वंदे विद्या’ आणि ‘विविधता में एकता से विकास’ या दोन आकर्षक टॅब्लोंमध्ये महाराष्ट्रातील युवकांचा सहभाग असणार आहे.

‘वंदे विद्या’ या शैक्षणिक संकल्पनेच्या टॅब्लोमध्ये शिक्षणाचे महत्त्व, ज्ञान, प्रगती आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याचा संदेश मांडण्यात येणार आहे. यामध्ये लखन ननावरे, वैभव जिवतोडे, ऋषिकेश शेलार, नकुल गोवर्धन आणि रुपेश कुत्तरमारे यांची निवड झाली आहे.

तर ‘विविधता में एकता से विकास’ या संकल्पनेच्या टॅब्लोमध्ये भारतातील विविध भाषा, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेतून साधल्या जाणाऱ्या राष्ट्रीय विकासाचा संदेश मांडण्यात येणार आहे. या टॅब्लोसाठी आकाश हाके यांची निवड झाली आहे.



💥राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव 💥

देशाच्या विविधतेतून एकता आणि एकतेतून विकास हा संदेश राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याची संधी या सहाही युवकांना मिळणार आहे. युवकांच्या कलागुणांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने Youth Socialgram Foundation चा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या निवडीमुळे महाराष्ट्रातील युवकांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली असून, लखन ननावरे, आकाश हाके, वैभव जिवतोडे, ऋषिकेश शेलार, नकुल गोवर्धन आणि रुपेश कुत्तरमारे या सहाही निवड झालेल्या युवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली ही संधी निश्चितच अभिमानास्पद असून, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देशभर पोहोचविण्यासाठी हे युवक सज्ज झाले आहेत.

अभिषेक किशोर भागडे