6 November 2026News Website

आर्णी–केळापूरच्या विकासाला आणि युवकांच्या रोजगाराला नवी दिशा: आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांची मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट

आर्णी–केळापूर :- राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मा. श्री. मंगलप्रभातजी लोढा यांची आर्णी–केळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी नुकतीच भेट घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) महत्त्वाच्या तांत्रिक ट्रेडना मान्यता मिळवून देण्यासह मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासात्मक प्रश्नांवर सविस्तर आणि आक्रमक चर्चा करण्यात आली.

आयटीआयच्या ‘या’ ट्रेडसाठी आक्रमक पाठपुरावा

सध्या आयटीआय मधील ऑटो इलेक्ट्रिशियन आणि मेकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स (MAE&E) या आधुनिक ट्रेडचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी सदर ट्रेडसाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय मान्यता, अत्याधुनिक यंत्रसामग्री व इतर पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी मंत्र्यांकडे केली. तसेच, हे ट्रेड यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना हँड-ऑन ट्रेनिंगसह स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर हक्काच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

मतदारसंघातील जनहिताच्या प्रश्नांना गती

केवळ कौशल्य विकासच नव्हे, तर आर्णी–केळापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असल्याचे दाखवून देत आमदार तोडसाम यांनी मतदारसंघातील अनेक प्रलंबित व जनहिताच्या विषयांवर मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. स्थानिक पातळीवर युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या संधी कशा वाढवता येतील, यावरही बैठकीत सखोल मंथन झाले.

“युवकांच्या हाताला काम आणि कौशल्य विकासाला योग्य चालना मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने प्रगती साधता येत नाही. आर्णी–केळापूर मतदारसंघातील तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि मतदारसंघाचा प्रत्येक विकासप्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने आणि जोमाने सुरूच राहतील.” लोकप्रिय आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम

अभिषेक किशोर भागडे