6 November 2026News Website

परिवहन वाहनधारकांनी 1 नोव्हेंबरपूर्वी योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे

चंद्रपूर, दि. 27 :-  चंद्रपूर जिल्ह्यातील परिवहन संवर्गातील ज्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची (फिटनेस सर्टिफिकेट) मुदत 30 नोव्हेंबर 2026 रोजी संपुष्टात येणार आहे, अशा वाहनधारकांनी 1 नोव्हेंबर 2026 पूर्वी आपल्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रावसाहेब रगडे यांनी केले आहे.

मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 56 नुसार परिवहन संवर्गातील वाहनांना वैध योग्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार 1 नोव्हेंबर 2026 पासून परिवहन संवर्गातील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. मात्र चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील स्वयंचलित वाहन चाचणी केंद्राचे कामकाज अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील परिवहन वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी लगतच्या जिल्ह्यातील स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रात जावे लागणार आहे.

ही बाब लक्षात घेता, ज्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची मुदत 30 नोव्हेंबर 2026 रोजी संपणार आहे, अशा वाहनधारकांनी गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन वाहन 4.0 प्रणालीवर अर्ज करून आगाऊ अपॉइंटमेंट घ्यावी. तसेच 1 नोव्हेंबरपूर्वी वाहनांची आवश्यक तपासणी करून योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण पूर्ण करावे. वाहनधारकांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता नूतनीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रावसाहेब रगडे यांनी केले आहे.

 

अभिषेक किशोर भागडे