6 November 2026News Website

वरोरा क्रीडा संकुलात मेळाव्याचे ग्रहण खेळाडूंच्या भविष्याशी खेळ चालवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

वरोरा :- स्थानिक क्रीडा संकुलात खेळाडूंच्या सरावात अडथळा निर्माण करणाऱ्या निर्णयाविरोधात वरोरा क्रीडा संकुलातील खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. क्रीडा संकुलात सहा दिवसांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे होत असलेल्या त्रासाबाबत संताप व्यक्त करत खेळाडूंनी माननीय आमदार साहेबांना च्या कार्यालयात निवेदन सादर केले आहे.

खेळाडूंच्या सरावात खंड भविष्याशी खेळ वरोरा येथील क्रीडा संकुलात दररोज शेकडो विद्यार्थी आणि खेळाडू विविध खेळांचा नियमित सराव करण्यासाठी येतात. आगामी स्पर्धांची तयारी करणाऱ्या या होतकरू खेळाडूंसाठी नियमित सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, क्रीडा संकुलात सहा दिवस मेळावा भरवल्यामुळे खेळाडूंच्या सरावात मोठा अडथळा निर्माण झाला असून खेळाचे मैदानही प्रभावित झाले आहे. खेळाडूंना सराव करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याच्या मूळ उद्देशालाच यामुळे हरताळ फासला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया खेळाडूंमधून उमटत आहे.

अन्य योग्य जागेची व्यवस्था करा! विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांचा सराव डोळ्यांसमोर ठेवून क्रीडा संकुलातील मेळावा आयोजनाचा निर्णय तातडीने बदलावा, तसेच या मेळाव्यासाठी अन्य योग्य पर्यायी जागेची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खेळाडूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

या निवेदनाची प्रत ही वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या PA व वरोरा चे नगराध्यक्ष, व नगरसेवक, वरोरा यांनाही पाठवण्यात आली असून, प्रशासकीय यंत्रणा यावर काय ठोस पावले उचलते, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

अभिषेक किशोर भागडे