चंद्रपूर :- समाज शांत, सुरक्षित आणि भयमुक्त राहावा यासाठी दिवस-रात्र अहोरात्र पहारा देणारे, कायदा व सुव्यवस्था राखताना आणि गुन्हेगारांचा खात्मा करताना प्राणांची पर्वा न करता वीरमरण पत्करणाऱ्या अमर पोलिसांच्या त्यागाला सलाम करण्याचा ऐतिहासिक दिवस म्हणजे ‘पोलीस स्मृतीदिन’. या निस्वार्थ आणि महान त्यागाला आदरांजली अर्पण करण्यासाठी दिनांक २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभरासह चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य व गांभीर्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मुख्य आदरांजली सोहळा बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०८:३० वाजता चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा स्मारक मैदानावर पार पडणार आहे.या सोहळ्यास मा. श्रीमती वसुमना पंत (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या मुख्य उपस्थितीत पोलीस दलातील हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली जाईल. तसेच कार्यक्रमाला श्री. पुलकित सिंह (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर आणि श्री. अकनुरी नरेश (भा.प्र.से.), आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
आपल्या रक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या या वीर जवानांच्या स्मृतीस नमन करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चंद्रपुरातील नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन श्री. आयुष नोपानी (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व श्री. ईश्वर कातकडे (म.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- स्थळ :- हुतात्मा स्मारक मैदान, पोलीस मुख्यालय, चंद्रपूर
- दिनांक व वेळ :- बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६, सकाळी ०८:३० वाजता





