6 November 2026News Website

जय अंबे शारदा उत्सव मंडळ, वरोरा यांची मोठी फसवणूक; कलकत्ता-हावराहवरून आलेले मजूर २५ हजार अडव्हान्स व ५५ हजार रक्कम घेऊन पसार!

वरोरा :- आगामी उत्सवाच्या तयारीसाठी कलकत्ता आणि हावराह येथून कामासाठी आणलेल्या मजुरांनी जय अंबे शारदा उत्सव मंडळ  फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येण्या-जाण्याचा खर्च व इतर कारणांसाठी २५,००० रुपये अडव्हान्स घेण्यासोबतच, मजुरीपोटी आणखी ५५,००० रुपये असे एकूण रोख पैसे उकळल्यानंतर हे मजूर रात्रीतून काम न करताच पसार झाल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे.



काय आहे नेमका प्रकार :- मिळालेल्या माहितीनुसार, आगामी उत्सवाच्या निमित्ताने मंडळ व स्थानिक नागरिकांना सजावट व इतर तयारीसाठी मजुरांची आवश्यकता होती. यादरम्यान, पश्चिम बंगालमधील कलकत्ता व हावराह येथून काही मजूर कामासाठी उपलब्ध होऊ शकतात, असा संपर्क मध्यस्थांमार्फत झाला. त्यानुसार उत्सव मंडळाने व संबंधितांनी विश्वास ठेवून त्या मजुरांना आणण्यासाठी व प्रवासाचा खर्च म्हणून सुरुवातीला २५,००० रुपये ऑनलाइन व रोख स्वरूपात दिले.



हे मजूर वरोरा परिसरात पोहोचल्यानंतर त्यांनी काही दिवस काम करण्याचे नाटक केले. यादरम्यान त्यांनी विश्वासात घेऊन मजुरीपोटी आणखी ५५,००० रुपये रोख रक्कम उकळली. मात्र, खिशात मोठी रक्कम पडताच या मजुरांचा खरा कट समोर आला. दुसऱ्याच दिवशी हे सर्व मजूर कोणालाही न सांगता आणि काम अर्धवट सोडून अचानक पसार झाले.



फसवणुकीमुळे मंडळात चिंतेचे वातावरण उत्सवाचा काळ जवळ येत असताना ऐन वेळेवर झालेल्या या फसवणुकीमुळे जय अंबे शारदा उत्सव मंडळ आणि मदत करणाऱ्या नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या मजुरांची कोणतीही खात्रीशीर कागदपत्रे किंवा पुरेशी माहिती उपलब्ध न केल्यामुळे अशा भामट्या मजुरांचे फावत असल्याचे बोलले जात आहे.



नागरिकांमध्ये संताप आणि सावधगिरीचा इशारा अशा प्रकारे बाहेरून येणाऱ्या मजुरांकडून होत असलेल्या फसवणुकीच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उत्सव किंवा इतर कामांसाठी बाहेरील मजूर किंवा व्यक्तींना बोलवताना नागरिकांनी व मंडळांनी त्यांची योग्य ओळखपत्रे (आधार कार्ड इ.) तपासूनच आणि पूर्ण खबरदारी घेऊन व्यवहार करावेत, असे आवाहन आता जागरूक नागरिकांकडून केले जात आहे.



या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा असून, अशा भामट्या मजुरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

अभिषेक किशोर भागडे