वरोर (दि. ०३ ऑक्टोबर २०२६) :- पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतातील पिके वाचवण्यासाठी मौजा तुमगाव येथील त्रस्त शेतकऱ्यांनी महावितरणकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची आक्रमक मागणी केली आहे. शिवसेनेचे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे कार्यकर्ते आशिष लता संजय रणदिवे यांच्या सहभागाने महावितरण कंपनीच्या खांबाडा (ता. वरोरा) उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्यांना याबाबतचे जाहीर निवेदन सादर करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या :- कृषी पंपांना १२ तास वीज पावसाअभावी शेतातील पिके सुकत असल्याने उपलब्ध पाण्याचा वापर करण्यासाठी तुमगाव शेतशिवारातील कृषी पंपांना सकाळी ६:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत नियमित वीज पुरवठा करण्यात यावा.
- वीज पुरवठ्यातील कपात थांबवावी :- सध्या दिवसातून केवळ १ ते २ तास वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
- रात्री एक फेज वीज सुरू ठेवावी :- सध्या शेतात सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असल्याने बाहेरगावचे मजूर शेतातच वास्तव्य करतात. परंतु, रात्रीच्या वेळी महावितरणकडून तीनही फेज बंद ठेवल्या जात असल्याने मजुरांच्या राहण्याचा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रात्री ६:०० वाजेपासून एक फेज वीज पुरवठा नियमित सुरू ठेवावा.
💥 मोर्चा आणि आमरण उपोषणाचा इशारा💥 शेतकऱ्यांच्या या दोन्ही मागण्यांवर महावितरणने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरीत कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. जर वरील दोन्ही मागण्या मान्य न झाल्यास आगामी दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरुवार रोजी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.





