Home जिल्हा बारा वर्षांच्या देवयानी दानवचा अनोखा विक्रम डोळ्यांवर पट्टी बांधून 84 सेकंदांत केले...

बारा वर्षांच्या देवयानी दानवचा अनोखा विक्रम डोळ्यांवर पट्टी बांधून 84 सेकंदांत केले 48 गुणाकार वंडर किड ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कारानेही झाला सन्मान

वरोर :- आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. विशेषतः गणित विषयात शिष्यवृत्ती, नवोदय तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जलद आणि अचूक गणित सोडविण्यासाठी विविध तंत्रे व ‘ट्रिक्स’चा उपयोग केला जातो. अशाच आगळ्यावेगळ्या ‘ब्लाइंडफोल्ड’ प्रशिक्षणातून चंदीगड येथील चिमुकल्या कु. देवयानी पारुल-दिनेश दानव हिने आपल्या असामान्य कौशल्याची छाप पाडली आहे. ती वरोरा तालुक्यातील उमरे परिवाराची नात आहे.



डोळ्यांवर पट्टी बांधून संख्या ओळखणे, बेरीज-वजाबाकी करणे आणि गणिताची उदाहरणे सोडविणे हे ऐकायलाही आश्चर्यकारक वाटते. मात्र सातत्यपूर्ण सराव, एकाग्रता आणि जिद्दीच्या जोरावर हे शक्य असल्याचे देवयानीने सिद्ध केले आहे. तिने डोळ्यांवर पट्टी बांधून अवघ्या 84 सेकंदांत 48 गुणाकाराची उदाहरणे सोडविण्याचा विक्रम केला आहे.



देवयानीच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड्स कडून करण्यात आली असून जून महिन्यात तिचा मेडल, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तिला ‘वंडर किड ऑफ द वर्ल्ड’ हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.



💥 गणिताची बालपणापासून आवड 💥देवयानी चंदीगड येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. बालपणापासूनच तिला गणित विषयाची विशेष आवड आहे. गणितात सातत्याने उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या देवयानीने आपल्या आवडीचे रूपांतर अनोख्या विक्रमात केले. गुणाकाराची उदाहरणे डोळ्यांवर पट्टी बांधून सोडविण्याबरोबरच तिने ब्लाइंडफोल्ड पद्धतीने अनेक संख्या ओळखण्याचे कौशल्यही आत्मसात केले आहे.



💥 माईंड ब्रेन अकॅडमी’च्या प्रशिक्षणाची जोड 💥

देवयानीची आई पारुल दानव यांनी सांगितले की, देवयानी बालपणापासूनच हुशार आहे. तिला गणिताची विशेष आवड आहे. तिची जिद्द आणि चिकाटी पाहून डॉ. किरण काकडे यांच्या ‘माईंड ब्रेन अकॅडमी’मधून दोन महिन्यांचे ऑफलाइन-ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे तिची एकाग्रता, फोकस, आत्मविश्वास आणि मानसिक क्षमतांमध्ये सकारात्मक वाढ झाली. त्यानंतर सातत्यपूर्ण सरावाच्या माध्यमातून देवयानीने या कौशल्यावर प्रभुत्व मिळविले. मागील तीन वर्षांपासून ती अबॅकसचे प्रशिक्षणही घेत आहे.

देवयानीची जिद्द, मेहनत आणि बुद्धिमत्ता यांचा त्रिवेणी संगम साधल्यामुळेच हे यश मिळाले असून, आपण केवळ तिचा सराव घेण्याचे काम केले, असे पारुल दानव यांनी सांगितले. वडील दिनेश दानव यांचेही तिला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. ते पंजाब केमिकल्समध्ये जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.



💥 महाराष्ट्र मंडळात विक्रमाचा डेमो 💥 15 ऑगस्ट 2026 रोजी चंदीगड येथील महाराष्ट्र मंडळात देवयानीने डोळ्यांवर पट्टी बांधून चलनातील नोटांवरील अंक, प्लेइंग कार्ड्सचे अंक आणि रंग ओळखणे, त्याचबरोबर लायसन्स वरील नाव ओळखणे, डेमो सादर केला. तिची ही अनोखी कामगिरी पाहून उपस्थितांनी तिचे कौतुक केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकताच चंदीगड येथील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने तिचा कौतुकास्पद सन्मान करण्यात आला.



💥चिमूरच्या आजी-आजोबांकडून कौतुकाची थाप💥 देवयानी ही चिमूर येथील डॉ. कमलाकर उमरे आणि सौ. अल्का उमरे यांची नात आहे. आपल्या नातीने मिळविलेल्या या अनोख्या यशाबद्दल डॉ. कमलाकर उमरे आणि आजी सौ. अल्का उमरे यांनी तिचे मनापासून कौतुक केले आहे. देवयानीच्या या कामगिरीमुळे कुटुंबीयांसह चिमूर परिसरातील नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.



💥 सराव, जिद्द आणि आत्मविश्वासातून यश 💥

डोळ्यांवर पट्टी बांधून संख्या ओळखणे आणि गणिताची उदाहरणे सोडविणे ही बाब अनेकांना नवलाची वाटते. मात्र योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि एकाग्रतेच्या माध्यमातून हे कौशल्य आत्मसात करता येते, हे देवयानीने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. तिच्या या यशामागे जिद्द, आवड, चिकाटी, मेहनत आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन यांचा मोठा वाटा आहे. लहान वयात गणिताच्या क्षेत्रात अशी अनोखी कामगिरी करणाऱ्या देवयानीचे सर्वत्र कौतुक होत आहे.