वरोरा :- स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधून सद्भावना एकता युवा मंचच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सद्भावना चौक, वरोरा येथे देशभक्तीपर गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले. विदर्भातील प्रसिद्ध गायक रहमत बाबा, भद्रावती येथील मीनल टेकाडे आणि आनंदवन येथील स्वरानंद ऑर्केस्ट्राचे प्रमुख गायक बी. मंगेश. श्री पेटकर मॅडम यांनी सादर केलेल्या सुमधुर देशभक्तीपर गीतांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाला वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर शहरातील अनेक नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक यांनी सुद्धा कार्यक्रमाला भेट दिली सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा आणि देशात शांतता नांदावी या उद्देशाने सद्भावना एकता युवा मंचने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने अशा देशभक्तीपर व सामाजिक सलोखा निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सायंकाळी सात वाजता सुरू झालेली गीतांची मैफल रात्री दहा वाजेपर्यंत रंगली. गायकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीते सादर करत वातावरणात देशप्रेमाची भावना जागवली. शेकडो रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरवर्षी अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, अशी अपेक्षाही रसिकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ गुडधे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छोटूभाई जैरुद्दीन शेख, गोपाळ गुडधे, वसंतराव विधाते प्रमोद वाभीटकर, पंकज जिवतोडे, प्रशांत पिपरे, राकेश जिवतोडे, विनोद गीलोरकर, गुलाब धोबे हर्षल खामकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सद्भावना चौकात रंगलेल्या या देशभक्तीपर गीतांच्या मैफलीमुळे स्वतंत्रता दिनाच्या उत्सवाला सांस्कृतिक आणि सामाजिक एकोप्याची जोड मिळाली.




