वर्धा :- सध्याच्या धावपळीच्या युगात शिक्षण किंवा नोकरीनिमित्त अनेक तरुण मंडळी घरापासून दूर आहेत. यामुळे घरात एकटेच राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. अशा स्थितीत ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ मदत मिळावी आणि त्यांचे जीवन अधिक सुरक्षित व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘JEEVAN’ (Joint Elderly Empowerment & Virtual Assistance Network) हे विशेष मोबाईल ॲप लाँच केले आहे. या ॲपचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.
‘JEEVAN’ ॲपची ठळक वैशिष्ट्ये
हे ॲप ज्येष्ठ नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने ‘डिजिटल सोबती’ ठरणार आहे. यामध्ये ‘One Tap to Call’ ही महत्त्वाची सुविधा देण्यात आली असून, त्याद्वारे थेट खालील क्रमांकांना संपर्क साधता येणार आहे:
☎️ ११२ पोलीस विभागाची आपत्कालीन हेल्पलाइन (टोल फ्री).
☎️ १०८ रुग्णवाहिका सेवा.
☎️ १४५६७ एल्डर हेल्पलाइन (ज्येष्ठ नागरिक मदत क्रमांक).
☎️ ११२ क्रमांक कशासाठी
ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक त्रास, मानसिक छळ, शिवीगाळ, धमकावणे किंवा सायबर फसवणुकीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागल्यास, त्यांनी तत्काळ ☎️ ११२ या क्रमांकावर कॉल करावा. या नंबरवर कॉल करताच वर्धा पोलीस विभागाकडून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल.
💠 पोलीस अधीक्षकांचे स्पष्ट आदेश 💠
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा ही वर्धा पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांनी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मोबाईलमध्ये ‘JEEVAN’ ॲप तातडीने डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे.
आपत्कालीन प्रसंगी एका क्लिकवर पोलीस मदत मिळवण्यासाठी हे ॲप एक महत्त्वाचे ‘डिजिटल कवच’ ठरणार आहे.




