मुंबई/चंद्रपूर :- राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपरिषद शाळांमध्ये २०१२ पासून अत्यंत अल्प मानधनावर सेवा देणाऱ्या क्रीडा, कला आणि कार्यानुभव निदेशकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या निदेशकांनी आपल्या प्रलंबित मागण्या आणि हक्कांच्या रक्षणासाठी आज (दि. ३ जुलै) मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले.
💠शासकीय तांत्रिक अटींमुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर💠
२०१२ पासून सहावी ते आठवीच्या ज्या शाळांमध्ये १०० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आहे, तिथे निदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. या निदेशकांनी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र, शासनाच्या जाचक तांत्रिक अटी आणि दरवर्षी कमी होणाऱ्या पटसंख्येच्या कारणामुळे अनेक शाळांमधील निदेशकांचा रोजगार हिरावला गेला आहे. पूर्णवेळ कर्तव्य बजावूनही मिळत असलेले अत्यल्प मानधन आणि अनिश्चिततेचे सावट यामुळे निदेशकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
💠 शिक्षणमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन 💠
चंद्रपूर जिल्ह्यातील निदेशकांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत मंत्री महोदयांची भेट घेतली. यावेळी निदेशकांनी आपल्या व्यथा मांडतानाच, वाढती महागाई आणि अनेक वर्षांपासून असलेली सेवेची वर्षे लक्षात घेता मानधनात वाढ करण्याची व नोकरीची सुरक्षा निश्चित करण्याची मागणी केली. चर्चेदरम्यान नामदार दादाजी भुसे यांनी निदेशकांच्या समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत, यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
💠 प्रतिनिधी मंडळाची उपस्थिती 💠
या शिष्टमंडळात क्रीडा, कला, कार्यानुभव निदेशक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कुंदोजवार, सचिव अमोल आवारी, गणेश आकेवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि निदेशक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता शासनाकडून या निदेशकांच्या पदरात नेमके काय पडणार, याकडे संपूर्ण राज्यातील निदेशकांचे लक्ष लागले आहे.




