मुंबई :- शाळांच्या परिसरात ‘स्टिंग’च्या विक्रीवर बंदी; शिक्षण क्षेत्रात खळबळ.शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ सारख्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत. हे पेय शाळांच्या आवारात विकले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आल्याने ही कारवाई केली जाणार आहे.
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित करत बंदीची मागणी केली होती. ‘स्टिंग’ हे पेय घातक असल्याचे खुद्द कंपनीही मान्य करते, तरीही याच्या बाटलीवरील मजकूर वाचणे कठीण आहे. या पेयामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका असल्याचे लक्षात घेऊन, तंबाखूजन्य पदार्थांप्रमाणेच ‘स्टिंग’वरही शाळा परिसरात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.
मंत्री नरहरी झिरवळ यांनी यावर कडक भूमिका घेत म्हटले की, शाळांच्या आवारात या पेयांची विक्री करणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, धोकादायक पेयांची माहिती देणारे फलक विक्रेत्यांच्या दुकानावर लावण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे आता शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची सुरक्षा व्यवस्था लागू होणार आहे.




