वरोरा : स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा (नोंदणी क्रमांक एफ-१३०७९, चंद्रपूर) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या ‘लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्राच्या’ बॅनरचे विमोचन आज आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
हा उपक्रम १ जुलै २०२६ पासून सुरू होणार असून, उद्घाटन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. झोडपद्वीतील विद्यार्थ्यांसाठी या केंद्रात मोफत शिकवणी वर्ग, सामूहिक अभ्यास व्यवस्था, स्पोकन इंग्लिश क्लास, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण तसेच आठवड्यातून एक दिवस अधिकारी व मान्यवरांचे मार्गदर्शन अशा विविध मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
बॅनर विमोचनप्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव आशिष घुमे, उपाध्यक्ष संजय दानव, सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भागडे तसेच अमित चवले उपस्थित होते.
हे अभ्यास केंद्र कल्याणेश्वर हनुमान मंदिरासमोर, कर्मवीर वॉर्ड, वरोरा येथे सुरू होणार असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.




