Home Breaking News सायबर भामट्याचा पर्दाफाश: बनावट कर्ज मंजुरीच्या आमिषाने लाखो उकळणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला चंद्रपूर...

सायबर भामट्याचा पर्दाफाश: बनावट कर्ज मंजुरीच्या आमिषाने लाखो उकळणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांची बेड्या

चंद्रपूर :-फायनान्स कंपनीच्या नावाने बनावट कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका अट्टल सायबर गुन्हेगाराला चंद्रपूर सायबर पोलिसांनी पुणे येथून गजाआड केले आहे. विनोद शांताराम गडाख पाटील (वय ४४) असे या आरोपीचे नाव असून, तो स्वतःची ओळख बदलून विविध राज्यांत फसवणुकीचे जाळे विणत होता.
काय होती मोडस ऑपरेंडी
बाबुपेठ, चंद्रपूर येथील एका हार्वेस्टर मशीन विक्रेत्याच्या ग्राहकांना आरोपीने ‘पुनावाला फिनकॉप लि.’ चा कर्मचारी असल्याचे भासवून फसवले. आरोपीने स्वतःचे नाव ‘हेमंत जोशी’ सांगून ग्राहकांसोबत बनावट कर्ज करार केले आणि त्यांना १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे खोटे ‘लोन सॅन्शन लेटर’ पाठवले. कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ‘वृषभ ईखार’ या नावाच्या बँक खात्यावर ४ लाख ८६ हजार २५० रुपये ‘डाऊन पेमेंट’ म्हणून भरून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवली.
अशी झाली कारवाई
तक्रार प्राप्त होताच चंद्रपूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत अवघ्या काही दिवसांत आरोपीचा शोध घेऊन पुणे येथील त्याच्या घरातून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली. तपासादरम्यान समोर आले की, आरोपी विनोद पाटील हा नाशिक, लखनऊ, इंदूर आणि वडोदरा यांसारख्या शहरांमध्ये हेमंत पवार, रणवीर सिंग सिकरवार, मयंक वानखेडे यांसारखी विविध खोटी नावे वापरून लोकांची फसवणूक करत होता. आरोपीला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागरिकांसाठी आवाहन
चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोन किंवा व्हॉट्सॲपवरील कर्ज मंजुरीच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन केले आहे. अधिकृत बँकेत किंवा फायनान्स कंपनीत स्वतः जाऊन खात्री केल्याशिवाय कोणाच्याही बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करू नका. फसवणूक झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री. सुनिल गाडे  यांचे नेतृत्वात, सहा.पोलीस निरीक्षक श्री निलेश गिरी, सहा.पोलीस निरीक्षक श्री बलराम झाडोकर, सहा.पौरपनि मुजावर अली, पोहवा/कार्तिक खनके, पोहवा/उमेश रोडे, पोअं/राहुल पोंदे, पोअं/वैभव पत्तीवार, पोअं/गुणवंत मुंडके, पोअं/पंकज बावणे सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर आणि पोहवा/खुशाल चांदेकर, पोहवा/मंगेश झाडे पोस्टे चंद्रपूर शहर, पोस्टे बावडन (पिंपरी चिंचवळ) येथील मपोषि अर्चना राहणे, पोअं/बंडगर, पोअं/शिंदे आणि चापोअं/रुषभ बारसिंगे यांच्या नेतृत्वाखाली सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

👉  सदर गुन्हयातील आरोपी विनोद शांताराम गडाख पाटील यास दिनांक 17/06/2026 रोजी रात्रौ 22ः00 वा सुमारास पुणे येथे अटक करुन दिनांक 18/06/2026 रोजी मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, चंद्रपूर यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीची दिनांक 22/06/2026 पावेतो 5 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे.