वरोरा (प्रतिनिधी) :- वणी ते वरोरा मार्गे जाणाऱ्या शेंबड मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा मार्ग अक्षरश ‘मरणाचे सापळे’ बनला आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होऊन काही नागरिकांचे जीव गेले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाचे या गंभीर समस्येवर दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने नुकतेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास तीव्र स्वरूपाचे ‘चक्काजाम’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
💥 अनाथ’ रस्त्याचा कारभार आणि प्रशासनाची टोलवाटोलवी💥
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पीडब्ल्यूडी (सार्वजनिक बांधकाम विभाग) अधिकाऱ्यांना अनेकदा संपर्क साधला असता, ते टाळाटाळ करत आहेत. “हा मार्ग आमच्या हद्दीत येत नसून नॅशनल हायवेमध्ये (राष्ट्रीय महामार्ग) येतो,” असे पीडब्ल्यूडीचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडूनही या मार्गाची जबाबदारी झटकली जात आहे. त्यामुळे “हा मार्ग नेमका कोणाचा? हा रस्ता अनाथ आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पीडब्ल्यूडी विभागाने हा मार्ग आपल्या हद्दीत येत नसल्याचे लेखी पत्र मनसेला दिले आहे. जर हा मार्ग कोणाच्याच हद्दीत येत नसेल, तर या जीवघेण्या मार्गाला ‘अनाथ’ म्हणून घोषित करावे का, असा सवाल संतप्त नागरिकांमधून विचारला जात आहे.
💥 मनसेचा आक्रमक पवित्रा आणि आंदोलनाचा इशारा 💥
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांशी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी तातडीने संपर्क साधावा. तसेच, या जीवघेण्या रस्त्याची आणि खड्ड्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करून सर्वसामान्य जनतेच्या प्राणाचे रक्षण करावे.
केवळ विनंती अर्ज करूनही या मार्गाचा प्रश्न सुटत नसेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रस्त्यावर उतरून ‘चक्काजाम’ आंदोलन करावे लागेल, असा स्पष्ट इशारा मनसेने प्रशासनाला दिला आहे. लवकरच या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल.
💥 उपस्थित पदाधिकारी 💥
निवृत्ती अर्ज सादर करताना मनसेचे खालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते:
- प्रशांत सुमन जनार्दन जुंजारे (तालुका अध्यक्ष, मनसे वरोरा)
- आनंद गेडाम (शहराध्यक्ष, मनसे वरोरा)
- आलोक जाधव (तालुका उपाध्यक्ष, मनसे वरोरा)
- प्रतीक मुडे (शहर उपाध्यक्ष, मनसे वरोरा)
- साजिद पठाण (शहर उपाध्यक्ष, मनसे वरोरा)




