Home Breaking News वरोरा येथील मुख्य बाजारपेठेतील भीषण दुर्घटना: बदरी पेंट्सच्या वरच्या मजल्यावर AC ब्लास्टमुळे...

वरोरा येथील मुख्य बाजारपेठेतील भीषण दुर्घटना: बदरी पेंट्सच्या वरच्या मजल्यावर AC ब्लास्टमुळे आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठी हानी टळली! नगरपरिषद प्रशासनाचे कौतुक.

वरोरा :-येथील मुख्य रस्ता (मेन रोड) बाजारपेठ परिसरात असलेल्या प्रसिद्ध ‘बदरी पेंट्स’ या दुकानाच्या वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये वातानुकूलित यंत्राचा (AC) अचानक भीषण स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या स्फोटामुळे बेडरूममध्ये क्षणातच मोठी आग लागली. दुकान मालक जुज्जुरुद्दीन जव्हेरी यांच्या मालकीच्या या इमारतीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
🙏 अग्निशामक दलाची कौतुकास्पद कामगिरी 🙏
घटनेची माहिती मिळताच वरोरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे जवान रवी बरसे, निलेश तवाडे आणि मोरु सातपुते यांनी अत्यंत तत्परतेने आणि जीवाची परवा न करता घटनास्थळ गाठले. आग लागलेला परिसर हा मुख्य बाजारपेठेचा आणि गजबजलेला असल्याने आग पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, फायर टीमच्या या शूर जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यांच्या या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला असून आजूबाजूच्या दुकानांचे व मालमत्तेचे प्रचंड नुकसान होण्यापासून वाचले.
👉 नगरपरिषद प्रशासनाची तत्परता; नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव.
वरोरा नगरपरिषद प्रशासनाने दाखवलेली कमालीची सतर्कता आणि अग्निशामक यंत्रणेची सज्जता यामुळे या भीषण संकटावर वेळीच मात करणे शक्य झाले. मुख्य बाजारपेठेसारख्या दाटीवाटीच्या भागात आग लागूनही प्रशासनाने ज्या गतीने आणि नियोजित पद्धतीने मदतकार्य राबवले, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. संकटसमयी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर राहणाऱ्या वरोरा नगरपरिषद प्रशासनाचे आणि अग्निशामक दलाचे संपूर्ण शहरातून जाहीर कौतुक होत आहे.
🙏 जय विदर्भ 🙏