मारेगाव :- मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र राज्यात कायदेशीररित्या प्रतिबंधित असलेल्या H.T.B.T. (चोरबीटी) कापूस बियाण्यांची तस्करांकडून राजरोसपणे वाहतूक आणि विक्री सुरू आहे. स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील काही घटकांच्या छुप्या पाठिंब्यामुळे आणि दुर्लक्षामुळेच हा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष रोगे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मारेगाव तालुका हा कायम शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि आदिवासी बहुल भाग आहे. सध्या खरीप हंगामापूर्व शेतीची मशागत अंतिम टप्प्यात असून कापूस हे या भागातील मुख्य नगदी पीक आहे. आधीच आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे खोटे आमिष दाखवून तस्करांकडून हे अवैध बियाणे विकले जात आहे.
वास्तविक पाहता, या प्रतिबंधित बियाण्यांमुळे कापूस उत्पादनात मोठी घट होत असून जमिनीचा पोत बिघडत आहे. शेतकऱ्यांमध्ये या बियाण्यांबाबत योग्य जनजागृती करण्यात स्थानिक कृषी विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. या बियाण्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन ते अधिक कर्जबाजारी होत आहेत आणि त्यातूनच आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडत असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.
मारेगाव शहरासह तालुक्यातील चिंचाळा, आकापूर, वनोजादेवी, मार्डी, नवरगाव, चिंचमंडळ, वेगाव, बोटोणी, मदनपूर, कोथुर्ला, कुंभा या आणि इतर अनेक गावांमध्ये चोरट्या मार्गाने बियाण्यांची विक्री केली जात आहे. वारंवार सूचना देऊनही स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालय या गंभीर प्रकरणाकडे पूर्णपणे कानाडोळा करत आहे. किरकोळ आर्थिक लाभापोटी (चिरिमिरी) तस्करांना मोकळे रान करून दिले जात असून, अधिकाऱ्यांच्या या कुंभकर्णी झोपेमुळे शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असल्याचा थेट आरोप जिल्हा अध्यक्ष संतोष रोगे यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पत्रासोबत छुप्या मार्गाने विक्रीसाठी आलेल्या H.T.B.T. बियाण्यांच्या पाकिटांचे फोटो पुराव्यादाखल जोडले आहेत. मारेगाव तालुका बोगस व प्रतिबंधित बियाणेमुक्त करण्यासाठी कृषी विभागाने युद्धपातळीवर धाडसत्र राबवून कडक पावले उचलावीत. तसेच तस्करांशी संगनमत करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या मारेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




