Home Breaking News मराठी शाळेची मान उंचावली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून घेतली यशाची गरुडझेप.दुहेरी आनंद...

मराठी शाळेची मान उंचावली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून घेतली यशाची गरुडझेप.दुहेरी आनंद जयश्रीची नागपूर, तर भाग्यश्रीची चंद्रपूर पोलीस दलात झाली निवड.

कोरपना :-“जीवनात संघर्षाला जर आत्मविश्वास, जिद्द आणि कठीण परिश्रमाची जोड दिली, तर अशक्य वाटणारे ध्येयही साध्य करता येते,” हे कोरपना तालुक्यातील हेटी या छोट्याशा गावातील जुळ्या बहिणींनी सिद्ध करून दाखवले आहे. गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कु. जयश्री मारोती बुच्चे आणि कु. भाग्यश्री मारोती बुच्चे या जुळ्या बहिणींनी आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर पोलीस दलात स्थान मिळवून संपूर्ण परिसराचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. त्यांच्या या दुहेरी यशामुळे सध्या संपूर्ण पंचक्रोशीत फक्त आणि फक्त याच ‘खाकी’ वर्दीची चर्चा सुरू आहे.
🙏आई-वडिलांचे कष्ट आणि मुलींची कष्टाला साथ🙏
या जुळ्या भगिनींचे वडील मारोती बुच्चे हे अल्पभूधारक शेतकरी असून, आई सुनीता बुच्चे या घरच्या शेतीसोबतच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दुसऱ्याकडे मोलमजुरीचे काम करतात. अत्यंत गरिबी आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही या बुच्चे दांपत्याने शिक्षणाचे महत्त्व ओळखून मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. “मुलींनी शिकून मोठे व्हावे,” हे वडिलांचे स्वप्न आणि आईने दिलेली संस्कार व धैर्याची साथ, याच्याच जोरावर या दोन्ही बहिणींनी गरिबीशी दोन हात करत आपले खाकी वर्दीचे स्वप्न प्रत्यक्षात आणले.
जिल्हा परिषदेच्या शाळेतून यशाची गरुडझेप!
जयश्री आणि भाग्यश्री यांचे प्राथमिक शिक्षण हेटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या या दोघी मैदानावरही तितक्याच सक्रिय असायच्या. आजच्या आधुनिक काळात मराठी शाळा मागे पडत चालल्याची ओरड होत असताना, “मराठी शाळेत शिकूनही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती पूर्णही करता येतात,” हे या दोन्ही बहिणींनी आपल्या देदीप्यमान यशातून दाखवून दिले आहे.
🙏गाव भारावले; दोन्ही बहिणींचा जाहीर सत्कार🙏
अनेक अडचणी, आर्थिक मर्यादा आणि कठोर मैदानी व बौद्धिक सरावातून अखेर या दोघींच्या स्वप्नांना पंख मिळाले. जयश्री मारोती बुच्चे हिची नागपूर पोलीस दलात, तर भाग्यश्री मारोती बुच्चे हिची चंद्रपूर पोलीस दलात निवड झाली आहे. एकाच घरात एकाच वेळी दोन खाकी वर्दी आल्यामुळे संपूर्ण गाव आनंदाने भारावून गेले आहे. हेटी गावकऱ्यांच्या वतीने या दोन्ही जुळ्या बहिणींचा जाहीर सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
🙏 ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणास्त्रोत 🙏
जयश्री आणि भाग्यश्रीची ही यशोगाथा केवळ दोन बहिणींची यशोगाथा नाही, तर ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना नवी दिशा देणारी ठरत आहे. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून हे यश मिळवता येते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. आज संपूर्ण जिल्ह्यातून या जुळ्या बहिणींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
🙏 जय विदर्भ 🙏