मारेगाव:- तालुक्यातील खंडणी गावातील ग्रामपंचायत हद्दीत गेल्या १५-२० दिवसांपासून नागरिकांना अत्यंत दूषित, गढूळ आणि लाल-पिवळसर पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे. हे विषारी पाणी प्यायल्यामुळे गावात लहानांपासून थोरांपर्यंत आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, एकीकडे पाण्याचा उपसा कमी आणि दुसरीकडे मिळणारे पाणी आरोग्यासाठी घातक अशा कात्रीत नागरिक सापडले आहेत. प्रशासकीय यंत्रणा या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत ‘कुंभकर्णी’ झोपेत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली.
या समस्येची तत्काळ दखल घेत मनसेच्या नेतृत्वात आज मारेगाव पंचायत समितीवर जोरदार धडक देण्यात आली. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला अखेर जाग आली असून, सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने चौकशी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोपर्यंत खंडणीकरांच्या नळाला शुद्ध पाणी येत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा मनसे कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
या आंदोलनादरम्यान केवळ पाण्याचाच नव्हे, तर गावातील वाढत्या व्यसनाधीनतेचा गंभीर प्रश्नही लावून धरण्यात आला. खंडणी गावातील दारूबंदीचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून मारेगाव पोलीस स्टेशनला प्रलंबित असून गावात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे कौटुंबिक हिंसाचार वाढला असून तरुण पिढीही व्यसनाच्या आहारी जात आहे. या संदर्भात ग्रामस्थांसह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्यासाठी आणि गावातील सामाजिक शांततेसाठी मनसेचा हा लढा यापुढेही सुरूच राहील.
🙏 जय विदर्भ🙏




