Home क्राईम चंद्रपूर जिल्ह्याचा क्राईम ग्राफ रोखा! भाजपचे नवनियुक्त पोलीस अधीक्षकांना ९ कलमी ‘अल्टिमेटम’,कोळसा...

चंद्रपूर जिल्ह्याचा क्राईम ग्राफ रोखा! भाजपचे नवनियुक्त पोलीस अधीक्षकांना ९ कलमी ‘अल्टिमेटम’,कोळसा माफिया, रेती तस्करी आणि अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी; भाजप जिल्हा शाखेचे आक्रमक निवेदन.

चंद्रपूर :- अभिषेक किशोर भागडे
चंद्रपूर जिल्ह्याची ओळख ‘वाघांची भूमी’ म्हणून संपूर्ण राज्यात आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या भूमीला अवैध धंदे आणि गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. श्री. आयुषजी नोपानी साहेब यांना एक सविस्तर आणि आक्रमक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा आणि महानगरपालिका महापौर सौ. संगीताताई खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधले.
👉 भाजपच्या ९ प्रमुख आणि आक्रमक मागण्या:
१. शांतता समितीचे पुनर्गठन :- समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील समित्यांवर निष्पक्ष आणि प्रतिष्ठित नागरिकांची नियुक्ती करा.
२. अमली पदार्थांवर कठोर प्रहार :- तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थांच्या सिंडिकेटचा शोध घेऊन त्यांच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करा.
३. कोळसा चोरीला लगाम :- राष्ट्रीय संपत्तीची लूट करणाऱ्या कोळसा आणि कोल वॉशरी माफियांची साखळी मोडीत काढा. यात सामील असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय करू नका.
४. अपघातांवर नियंत्रण :- विनापरवाना वाहनचालक आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करून अपघातांचे प्रमाण शून्यावर आणा.
५. अवैध दारू विक्रीवर बंदी :- ग्रामीण आणि शहरी भागातील अवैध गावठी दारू आणि नियमबाह्य बिअर शॉपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने धाडी टाका.
६. रेती माफियांवर ‘मोक्का’ पर्यावरणाची हानी करणाऱ्या रेती माफियांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
७. महिला सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य :- छेडछाड आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी संवेदनशील भागात गस्त वाढवून शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवा.
८. विनापरवाना ‘ओयो’ हॉटेल्सवर कारवाई शहरातील सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्या आणि अनैतिक कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या विनापरवाना हॉटेल्सची कसून चौकशी करा.
९. शोभायात्रांमध्ये कडक सुरक्षा :-धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा.
💥 प्रशासनाला इशारा 💥
“चंद्रपूर जिल्हा हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत राज्यासाठी आदर्श ठरावा, ही आमची अपेक्षा आहे. वरील सर्व विषयांवर गांभीर्याने विचार करून जर तात्काळ आणि प्रभावी कारवाई झाली नाही, तर जनतेच्या हितासाठी भाजप सदैव सकारात्मक सहकार्य आणि प्रसंगी संघर्षासाठीही तयार राहील,” असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता नवनियुक्त पोलीस अधीक्षक या ‘अ‍ॅक्शन प्लॅन’वर कशी अंमलबजावणी करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏