चंद्रपूर :- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांच्या शेतीसाहित्यावर डल्ला मारणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ९ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या टोळीचा पर्दाफाश केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वरोरा, बल्लारपूर, गडचांदूर आणि राजुरा परिसरातून शेती अवजारे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, दि. १४ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोसारा ते पडोली मार्गावर सापळा रचून नाकाबंदी केली. या दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या शिवराज चिनकन वेलपुरी (वय ३९, रा. राजीव गांधी नगर, चंद्रपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपीच्या अटकेने ५ गुन्हे उघडकीस
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. यामुळे खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:
💠 वरोरा पोलीस ठाणे :-अप क्र. ८०३/२६ (कलम ३०३(२) बीएनएस)
💠 बल्लारपूर पोलीस ठाणे :-अप क्र. ६८८/२६ (कलम ३०३(२) बीएनएस)
💠 गडचांदूर पोलीस ठाणे :-अप क्र. ३४७/२६ व ३८६/२६ (कलम ३०३(२) बीएनएस)
💠 राजुरा पोलीस ठाणे :-अप क्र. ६००/२६ (कलम ३०३(२) बीएनएस)
💠 जप्त केलेला मुद्देमाल 💠
पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेले विविध शेती साहित्य व अवजारे (किंमत २,५१,५०० रु.) आणि चोरीसाठी वापरलेली महिंद्रा बोलेरो गाडी (क्र. MH-34-CQ-1310, किंमत ७,००,००० रु.) असा एकूण ९,५१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
💠 इतर आरोपींचा शोध सुरू 💠
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शिवराज वेलपुरी अटकेत असला तरी, त्याचे साथीदार असलेले आकाश हरिदास बेले (रा. भद्रावती), राजू वीरशपा स्वामीशेट्टी (रा. गडचांदूर) आणि रवी दगडुजी गदाई (रा. इंदिरानगर, चंद्रपूर) हे अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
ही धडाकेबाज कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभाग वरोरा व राजुरा पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये पसरलेली चोरांची दहशत काही प्रमाणात कमी झाली आहे.




