वरोरा :-वरोरा-दिंडोडा मार्गावरील शिरना नदीजवळ आज एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. एका सुसाट अज्ञात वाहनाने सायकलस्वाराला जोराची धडक दिली, ज्यामध्ये सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रामकृष्ण जेनेकर (६८ वर्ष, रा. दिंडोळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
👉नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण जेनेकर हे आज आपल्या वैयक्तिक कामासाठी वरोरा शहरात आले होते. काम आटोपून ते आपल्या सायकलने वरोरा येथून दिंडोडा या आपल्या गावाकडे परत जात होते. सायंकाळच्या सुमारास ते शिरना नदीच्या पुलाजवळ पोहोचले असता, मागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलला पाठीमागून भीषण धडक दिली.
धडक इतकी जोरात होती की, जेनेकर हे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जेनेकर यांचा जागीच श्वास कोंडला आणि त्यांचा करुण अंत झाला.
वाहनचालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू आहे
अपघात घडताच मदतीसाठी लोक धावून येण्यापूर्वीच अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्यावरील नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती वरोरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
शिरना नदीचा परिसर आणि वरोराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या भागात अनेकदा वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करतात, ज्यामुळे असे अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वरोरा पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे त्या ‘हिट अँड रन’ करणाऱ्या अज्ञात वाहनाचा कसून शोध घेत आहेत.
रामकृष्ण जेनेकर यांच्या अपघाती निधनामुळे दिंडोडा गावावर शोककळा पसरली असून, फरार वाहनचालकाला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळी पोलीस विभाग पाहणी करत असून तपास चालू आहे.
🙏 जय विदर्भ🙏




