Home राजकारण नागरी येथील पोथरा नदीच्या खोलीकरणासाठी सुरज धात्रक यांचे आमदारांना साकडे

नागरी येथील पोथरा नदीच्या खोलीकरणासाठी सुरज धात्रक यांचे आमदारांना साकडे

वरोरा :-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या व वरोरा तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या नागरी येथील पोथरा नदीच्या खोलीकरणाची आणि घाट सौंदर्यीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे वरोरा तालुका अध्यक्ष सुरज प्रमोदराव धात्रक यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. करणदादा संजयराव देवतळे यांना लेखी निवेदन देऊन पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.
🛑 गाळाचा प्रश्न गंभीर 🛑
नागरी गावापासून साधारण २ कि.मी. अंतरावरून वाहणारी पोथरा नदी ही परिसरासाठी महत्त्वाची आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ आणि रेती साचल्यामुळे पात्र अरुंद झाले आहे. इफको कंपनीद्वारे या नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला गेट नसल्यामुळे नदीपात्रात गाळाचे प्रमाण अधिक वाढले आहे.
🛑 शेतकऱ्यांचे नुकसान 🛑
नदीत गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात पाणी पात्राबाहेर शिरून आजूबाजूच्या शेतांमध्ये साचते. यामुळे नागरी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. नदीचे खोलीकरण झाल्यास पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नदीच्या पात्राचे खोलीकरण करण्यासोबतच त्या ठिकाणी घाट सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे परिसराचा कायापालट होण्यास मदत होईल.

“नागरी हे सीमेवरील महत्त्वाचे गाव असून पोथरा नदीचे खोलीकरण ही काळाची गरज आहे. आमदारांनी या विषयात लक्ष घालून तातडीने निधी मंजूर करावा आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करावा, अशी आमची विनंती आहे.”
👉क्षसुरज प्रमोदराव धात्रक (तालुका अध्यक्ष, BJYM, वरोरा)

या निवेदनामुळे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या प्रश्नावर काय पावले उचलतात, याकडे नागरीवासीयांचे लक्ष लागले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏