वरोरा :- शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांना कायमस्वरूपी पूर्णविराम देण्यासाठी अर्चना ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. शहराला ‘आदर्श शहर’ बनवण्याचा निर्धार करत, त्यांनी आमदार करणजी देवतळे यांची भेट घेऊन विकासाच्या मुद्द्यांवर थेट चर्चा केली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रलंबित विकासकामांचे निवेदन सादर करत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निधीतून विशेष सहकार्य मिळावे, अशी आक्रमक मागणी केली आहे.
👉 पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर भर
शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने राबवणे, तसेच प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या सोयीसाठी ‘वॉटर एटीएम’ बसवणे, या मागण्यांवर ठाकरे यांनी विशेष भर दिला. याशिवाय, शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी मोठ्या नाल्यांचे बांधकाम आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
👉 शिक्षण आणि सौंदर्यीकरणाचा संकल्प
केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नगर परिषदेच्या शाळांची तातडीने दुरुस्ती करणे आणि शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या तलावांचे सौंदर्यीकरण करणे, यांसारख्या विकासकामांकडेही त्यांनी आमदारांचे लक्ष वेधले. शहरातील अंतर्गत रस्ते आणि नाल्यांच्या कामांसाठीही निधीची मागणी करण्यात आली आहे.
👉 आमदार देवतळेंकडून सकारात्मक प्रतिसाद
अर्चना ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर आमदार करणजी देवतळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शहरातील समस्यांची व्याप्ती लक्षात घेता, टप्प्याटप्प्याने सर्वच मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार महोदयांनी दिले आहे. या आश्वासनामुळे वरोरा शहरातील प्रलंबित पायाभूत सुविधांचा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
🙏 जय विदर्भ🙏




