Home विदर्भ “सेवेला सलाम… नव्या नेतृत्वाला प्रणाम!”: चंद्रपुरात जिल्हाधिकाऱ्यांचा भावपूर्ण निरोप व जंगी स्वागत.

“सेवेला सलाम… नव्या नेतृत्वाला प्रणाम!”: चंद्रपुरात जिल्हाधिकाऱ्यांचा भावपूर्ण निरोप व जंगी स्वागत.

चंद्रपूर :- “जेथे कार्य करण्याची तळमळ असते, तिथे विकासाचा मार्ग आपोआप मोकळा होतो,” हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत मावळते जिल्हाधिकारी श्री. विनयजी गौडा जी.सी. यांना प्रियदर्शिनी सभागृहात अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. त्याचवेळी, चंद्रपूरच्या विकासाची धुरा हाती घेणाऱ्या नवनियुक्त जिल्हाधिकारी श्रीमती वसुमनाताई पंत यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. “सेवेला सलाम… नव्या नेतृत्वाला प्रणाम या घोषवाक्याने हा सोहळा अक्षरशः दुमदुमून गेला होता.
🔴  विकासपर्वाचा गौरव: श्री. विनयजी गौडा
कार्यक्रमात श्री. विनयजी गौडा यांच्या कार्यकाळातील लोकहिताच्या आणि विकासाभिमुख निर्णयांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रशासकीय शिस्त आणि सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची त्यांची शैली चंद्रपूरकरांच्या कायम स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले असून, त्यांनी लावलेला विकासाचा हा ‘रोपट्याचा वृक्ष’ आगामी काळात नक्कीच बहरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवी आशा, नवी दिशा: श्रीमती वसुमनाताई पंत
दुसरीकडे, नवनियुक्त जिल्हाधिकारी श्रीमती वसुमनाताई पंत यांच्या रूपाने जिल्ह्याला एक धडाकेबाज आणि अभ्यासू नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरच्या प्रगतीला अधिक गती मिळेल आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.
👉  दिग्गजांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार श्री. देवरावजी भोंगळे, आमदार करनदादा देवतळे, महापौर सौ. संगीताताई खांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) श्री. पुलकितजी सिंग, महानगरपालिका आयुक्त श्री. अकुनुरीजी नरेश, पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शनजी, उपविभागीय अधिकारी श्रीमती लघीमा तिवारीजी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासकीय बदलाच्या या सोहळ्याने एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला कृतज्ञतेने निरोप देतानाच, एका नव्या विकासाच्या पर्वाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏

 

👉 वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.