वरोरा :- (अभिषेक किशोर भागडे )स्थानिक संकल्प फाऊंडेशनच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रबोधनात्मक कार्यक्रम’ उत्साहात संपन्न झाला. दि. १४ एप्रिल रोजी मालवीय वॉर्डातील भदंत उपाली परिसर येथे हा सोहळा पार पडला.
👉 कार्यक्रमाचा प्रारंभ
सकाळी ९:३० वाजता डॉ. गौतम नगराळे आणि संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. विठोबाजी मुन यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून व मेणबत्ती-अगरबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी सामुदायिक ‘त्रिशरण-पंचशील’ ग्रहण केल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
👉 प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संजय बोधे सर होते. विशेष अतिथी म्हणून वरोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी (CO) मा. सिद्धार्थ मेश्राम उपस्थित होते. विचारमंचावर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्राचार्य मंगलाताई डांगरे , मा. भाऊरावजी निरंजने, मा. डॉ. गौतम नगराळे , मा. नगरसेवक राहुल देवढे आणि मा. विठोबाजी मुन यांची प्रमुख उपस्थिती होती.
👉 वैचारिक मंथन आणि मार्गदर्शन
यावेळी मार्गदर्शकांनी ‘आंबेडकरी समूहाकडूनच आंबेडकरी विचारांची होणारी पायमल्ली’ या विषयावर खोलवर चिंता व्यक्त केली. समाज दिशाहीन होत असताना समाजातील बुद्धिजीवी वर्गाने आपली भूमिका चोख बजावणे आवश्यक आहे, अन्यथा ही बाब चळवळीसाठी घातक ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की,
“केवळ चळवळीवर अवलंबून न राहता, सर्वसामान्य आंबेडकरी समाजाने स्वतःला बदलण्याची आणि काळाप्रमाणे सुधारण्याची गरज आहे.”
👉 विद्यार्थ्यांना ग्रंथवाटप व स्नेहभोजन
याप्रसंगी ‘बुद्ध धम्म प्रचार समिती’च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना ग्रंथवाटप करण्यात आले. प्रबोधन कार्यक्रमानंतर डॉ. गौतम नगराळे आणि बुद्ध धम्म प्रचार समितीच्या वतीने सुमारे २०० धम्मबांधवांसाठी सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन आणि आभार प्रदर्शन मा. अमर तीतरे यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🙏 जय विदर्भ 🙏




