8 November 2026News Website

मेधा पाटकर यांना 5 महिन्यांची शिक्षा

विनय कुमार सक्सेनांच्या मानहानीचे प्रकरण

नवी दिल्ली (New Delhi) 01 जुलै :- सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने मेधा पाटकर यांना विनय सक्सेना यांना 10 लाखांची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.

पाटकर आणि सक्सेना यांच्यात 2000 पासून कायदेशीर लढाई सुरू आहे. विनय सक्सेना यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात जाहिराती प्रकाशित केल्यानंतर मेधा पाटकर यांनी सक्सेनांच्या विरोधात खटला दाखल केला होता. तर पाटकर यांनी सक्सेनांच्या विरोधात प्रसिद्धी माध्यमांमध्ये बदनामीकारक विधाने केल्याबद्दल सक्सेना यांनी 2 गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणावर गेल्या 23 वर्षांपासून सुनावणी सुरू होती. गेल्या 7 जून रोजी दिल्लीच्या साकेत कोर्टाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवले होते. तसेच शिक्षा जाहीर करण्यासाठी 1 जुलै ही तारीख निश्चित केली होती. सक्सेना यांना ‘देशभक्त नाही तर भित्रा’ असे संबोधणे आणि हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करणारे पाटकर यांचे विधान केवळ बदनामीच नव्हे तर नकारात्मक समज निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आले होते, असे न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते. याप्रकरणी साकेत कोर्टाने आज, सोमवारी मेधा पाटकर यांना 5 महिन्यांचा कारावास आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान पाटकर यांनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले.

अभिषेक किशोर भागडे