Home Breaking News वरोरा तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ४ सप्टेंबर रोजी.

वरोरा तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ४ सप्टेंबर रोजी.

वरोरा :- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, क्रमांक ४३८, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार, एकूण आरक्षण ५०% पेक्षा जास्त असलेल्या सरपंच आरक्षणामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने वरोरा तालुक्यातील एकूण ८१ ग्रामपंचायतींमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (नागमाप्र), खुला प्रवर्ग तसेच महिला करीता सरपंच पदाची आरक्षण सोडत दिनांक ०४/०९/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता, पंचायत समिती सभागृह, वरोरा येथे आयोजित करण्यात आली आहे.
तहसीलदार, वरोरा कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या जाहीर सूचनेनुसार या प्रक्रियेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.



आरक्षणातील बदलाचे स्वरूप :-अनुसूचित जाती (अ.जा.) व अनुसूचित जमाती (अ.जा.) प्रवर्गाचे आरक्षण हे त्या त्या जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणावर निश्चित करण्यात येत असल्यामुळे, दिनांक १३ जून २०२५ च्या अधिसूचनेनुसार या प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल होणार नाही. १३ जून २०२५ च्या अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या केवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग  यांच्या आरक्षणामध्ये बदल होत आहे.



कायदेशीर तरतूद :- नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांचे सुधारित आरक्षण निश्चित करण्याकरिता ‘महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४’ मधील (५) (६) प्रमाणे ही सोडत काढण्यात येत आहे.मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयीन पत्र क्र. (साशा/कार्या-१२/टे-४/प्रापर्नि/2026/3386, दिनांक १९/०८/२०२६) द्वारे प्राप्त निर्देशानुसार ही प्रक्रिया पार पडत आहे.



महत्त्वाचे आवाहन :- वरोरा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच/सदस्य आणि इच्छुक ग्रामस्थांनी या आरक्षण सोडतीकरिता न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार वरोरा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.