नागपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासारख्या (मेयो) अत्यंत संवेदनशील व पवित्र परिसरात रुग्णांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मेयोच्या परिसरातील ‘श्री बालाजी उपहारगृहावर’ अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धाड टाकून धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे अत्यंत गंभीर उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे उपहारगृह तात्काळ सील करण्यात आले असून, या कारवाईमुळे खानावूळ व उपहारगृह चालकांचे धाबे दणाणले आहेत.
💥विनापरवाना राजरोस सुरू होता कारभार 💥
मेयो रुग्णालयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे शेकडो होतकरू विद्यार्थी, तरुण डॉक्टर तसेच दूरवरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक दररोज या उपहारगृहात चहा, नाश्ता आणि जेवणासाठी जातात. मात्र, अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ नुसार कोणताही कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी बंधनकारक असलेला वैध अन्न परवाना या उपहारगृहाकडे नव्हता. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हे हॉटेल राजरोसपणे सुरू ठेवण्यात आले होते, ज्याची एफडीएने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.
💥 अस्वच्छता आणि रोगांचा धोका 💥
तपासणीदरम्यान या उपहारगृहात आरोग्याला घातक ठरणारी भीषण अस्वच्छता आढळून आली. खाद्यपदार्थ तयार करताना किंवा ग्राहकांना देताना कोणतीही आरोग्यविषयक खबरदारी घेतली जात नव्हती. अन्नातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही सांडपाणी किंवा कचरा व्यवस्थापन यंत्रणा नव्हती. सर्वात संतापजनक म्हणजे, खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबतचा कोणताही अधिकृत तपासणी अहवाल व्यवस्थापनाकडे उपलब्ध नव्हता. रुग्णालयाच्या अगदी कुशीतच अशाप्रकारची घाणेरडी व रोगराई पसरवणारी परिस्थिती असल्याने हजारो रुग्णांना व विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजारांचा गंभीर धोका निर्माण झाला होता.
💥 आजारी कर्मचाऱ्यांकडून अन्न शिजवण्याची शक्यता💥
अन्नपदार्थ हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची नियमित वैद्यकीय तपासणी करणे कायद्यानुसार अनिवार्य आहे. मात्र, या उपहारगृहातील एकाही कर्मचाऱ्याचा वैद्यकीय फिटनेस अहवाल अधिकाऱ्यांना सादर करता आला नाही. परिणामी, आजारी किंवा अस्वच्छ कर्मचाऱ्यांकडून उघड्यावर खाद्यान्न तयार केले जात असल्याची दाट शक्यता असून, प्रशासनाने यावर कडक भूमिका घेतली आहे. वैध अन्न परवाना मिळवणे, सर्व कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय फिटनेस अहवाल सादर करणे, पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेचा दाखला देणे तसेच स्वच्छतेशी संबंधित सर्व त्रुटी तात्काळ दूर करून आवश्यक कागदपत्रे सादर करणे उपहारगृह चालकाला बंधनकारक करण्यात आले आहे. जोपर्यंत या सर्व अटींची काटेकोर पूर्तता होत नाही, तोपर्यंत हे उपहारगृह पुन्हा सुरू करण्यावर प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. या धडक कारवाईमुळे विनापरवाना व मनमानी पद्धतीने अन्नसुरक्षेचा बोजवारा उडवणाऱ्या व्यावसायिकांचे चांगलेच चांगलेच धाबे दणाणले आहेत.




