वरोरा :- नोकरीचे आमिष, सोने विक्री आणि बनावट नोटांच्या बहाण्याने विदर्भातील नागरिकांवर कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा कुख्यात महाठग विनोद सोयाम अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या भामट्याला वरोरा पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथून मंगळवारी रात्री बेड्या ठोकल्या.
💥 अशी होती ठगाची नवी मजल 💥
आरोपी विनोद सोयाम याने नागपूरमधील व्यापाऱ्यांसह अनेक सामान्य नागरिकांना विविध प्रलोभने दाखवून मोठी आर्थिक फसवणूक केली होती. त्याच्या ठकबाजीचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे होते:
नोकरीचे आमिष :-सरकारी व खाजगी नोकरी लावण्याच्या नावाखाली तरुणांची आर्थिक फसवणूक करणे.
सोण्याची बतावणी :- स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणे.
बनावट नोटांचा गोरखधंदा :-पैशाचे पाकीट दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा घालणे.
या सर्व गुन्ह्यांमध्ये तो कोट्यवधी रुपयांची माया जमवून फरार झाला होता आणि सतत आपले बस्तान बदलून पोलिसांना चकमा देत होता.
💥 पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई 💥
आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने वरोरा पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक व सायबर सेलच्या मदतीने कसून तपास सुरू केला. वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीष तालेवार आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीय व धडाकेबाज कामगिरी करत मध्य प्रदेशपर्यंत त्याचा माग काढला. इंदूर येथे लपून बसलेल्या विनोद सोयामचा छडा लावून पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली आणि वरोरा पोलीस ठाण्यात आणले.
💥 नागरिकांमधून सुटकेचा श्वास 💥
पोलिसांनी या मास्टरमाइंड भामट्याच्या मुसक्या आवळल्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांनी वरोरा पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे विदर्भातील इतर गुन्ह्यांचाही पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांचे आवाहन :-या महाठगाने आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी वरोरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.




