गडचिरोली / धानोरा :-गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन निष्पाप विद्यार्थिनींच्या झालेल्या दुर्दैवी आणि संतापजनक मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, मा. आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी आज आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी आश्रमशाळेच्या ढिसाळ आणि लापरवाह कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढत प्रशासनाला फैलावर घेतले.
💥व्यवस्थापनाच्या कारभाराची कसून तपासणी💥
घटनास्थळी पाहणी करताना आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, भोजन व्यवस्था तसेच विविध सोयी-सुविधांच्या रजिस्टरची अत्यंत कसून तपासणी केली. आश्रमशाळेत उपलब्ध असलेल्या सुविधांचा सविस्तर आढावा घेत असताना अनेक गंभीर त्रुटी व अकार्यक्षमता त्यांच्या निदर्शनास आली, ज्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला.
आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांचे आक्रमक व स्पष्ट निर्देश
सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य :-विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या कोणत्याही त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाहीत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राधान्य असून, त्याबाबत कोणतीही हयगय न करता तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात.
त्रुटींची त्वरित पूर्तता :- पाहणी दरम्यान आढळलेल्या सर्व त्रुटी व कमतरता तात्काळ आणि विनाविलंब दूर करण्याचे सक्त निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
परिसर स्वच्छता मोहीम :- आश्रमशाळा परिसरातील वाढलेले गवत, झुडपे आणि अस्वच्छता नियमितपणे व तातडीने दूर करून संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित व निरोगी ठेवण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आले.
“विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांचे प्राण अबाधित राहावेत, यासाठी प्रशासनाने कसलीही टाळाटाळ न करता युद्धपातळीवर ठोस उपाययोजना कराव्यात,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी प्रशासनाला तडाखा दिला आहे. या दुर्घटनेमुळे राज्यभरातील आश्रमशाळांच्या सुरक्षेचा आणि विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.




