वणी :- गडचिरोली येथील एका आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन निष्पाप चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली असून, प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय निष्काळजीपणामुळेच या मुलींना प्राण गमवावे लागल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी केला आहे. आदिवासी विकास विभागाचा तब्बल २१ हजार कोटी रुपयांचा मोठा अर्थसंकल्प असतानाही आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला असून, लेकींच्या सुरक्षिततेबाबत होणारी ही दिरंगाई अत्यंत निंदनीय असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सदर आश्रमशाळेतील कारभाराची पोलखोल करताना समोर आले आहे की, येथील तब्बल ७९ मुलींना आजही नाईलाजाने जमिनीवर झोपवावे लागते. विद्यार्थिनींना झोपण्यासाठी कॉट उपलब्ध करून देण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित असूनही प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कोट्यवधींचा निधी कागदावर असताना आदिवासींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी साधी कॉट आणि इतर मूलभूत सुविधा पुरवणे प्रशासनाला जड गेले असल्याची मोठी शोकांतिका या दुर्घटनेमुळे चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत मनसे नेते राजू उंबरकर यांनी राज्य सरकारसमोर काही आग्रही मागण्या ठेवल्या आहेत.
मृत मुलींच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, दुर्घटनेत बाधित किंवा जखमी झालेल्या इतर विद्यार्थिनींवर सर्वोत्तम आणि मोफत वैद्यकीय उपचार केले जावेत, तसेच या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, भविष्यात अशा अनुचित घटना टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आश्रमशाळांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थिनीच्या सुरक्षित निवासाची हमी मिळेल, असा आग्रह धरण्यात आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या यंत्रणेची कसून चौकशी होऊन लवकरात लवकर कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या दुर्घटनेमुळे आता राज्यभरातील आश्रमशाळांच्या सुरक्षिततेचा आणि तेथील यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




