वनी :- तालुक्यातील चनोडा गावातील नागरिक व विद्यार्थ्यांची कित्येक वर्षांची दळणवळणाची समस्या अखेर कायमस्वरूपी मार्गी लागली आहे. गावात राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज मारेगाव येथे जाण्यासाठी पायपीट करावी लागत होती, तर नागरिकांचेही प्रवासाअभावी प्रचंड हाल होत होते. मानव विकास मिशनअंतर्गत गावात बसफेरी सुरू व्हावी यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी महामंडळाकडे अनेकदा निवेदने दिली होती, मात्र प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. परिणामी गावातील ५४ शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. प्रशासनाच्या या नाकर्तेपणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी थेट मैदानात उतरून पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या उद्देशाने त्यांनी जुलै महिन्यात ‘अमित ठाकरे दत्तक योजने’अंतर्गत ‘एक हात विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी’ हे ब्रीद समोर ठेवून चनोडा ते मारेगाव मार्गावर स्वखर्चाने मोफत खाजगी बस सेवा सुरू केली होती. त्यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मारेगाव तालुका अध्यक्ष रूपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, वामन चटकी, रोशन शिंदे, निखिल मेहता, आकाश खामणकर आणि ॲड. योगेंद्र तुराणकर यांच्यासह मनसे सैनिकांनी या उपक्रमासाठी प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून परिश्रम घेतले होते. या तात्पुरत्या सुविधेमुळे गेल्या तीन महिन्यांत ५४ विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी वणवण थांबली होती. मात्र केवळ तात्पुरती सोय करून न थांबता गावात महामंडळाची हक्काची लालपरी सुरू व्हावी यासाठी राजू उंबरकर यांनी एसटी प्रशासनाकडे सतत आणि आक्रमक पाठपुरावा लावून धरला. अखेर त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले असून एसटी महामंडळाने पहिल्यांदाच चनोडा गावासाठी नियमित बस सेवा मंजूर करत सुरू केली आहे. गावात पहिल्यांदाच अधिकृत लालपरी दाखल होताच संपूर्ण चनोडा ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. कित्येक वर्षांची पायपीट थांबवून शिक्षणाची वाट सुकर केल्याबद्दल समस्त चनोडा ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने मनसे नेते राजू उंबरकर यांचे जाहीर आभार मानण्यात आले.
‘अमित ठाकरे दत्तक योजने’तून सुरू झाली होती मोफत बस :- मानव विकास मिशनअंतर्गत बसफेऱ्या सुरू करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी महामंडळाकडे वारंवार निवेदने दिली होती; मात्र प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. गावातील तब्बल ५४ शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. प्रशासनाच्या या नाकर्तेपणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर गावात एसटी दाखल.केवळ तात्पुरती मोफत सोय करून न थांबता गावात महामंडळाची हक्काची लालपरी सुरू व्हावी, यासाठी राजू उंबरकर यांनी एसटी प्रशासनाकडे सतत आणि आक्रमक पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून एसटी महामंडळाने पहिल्यांदाच चनोडा गावासाठी नियमित बस सेवा मंजूर करत सुरू केली आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; मारेगाव तालुक्यातील ‘चनोडा’ गावात पहिल्यांदाच धावली लालपरी, गावकऱ्यांनी मानले राजू उंबरकर यांचे आभार मानले.




