वणी :-मारेगाव तालुक्यातील मौजा केगाव (वे) ता. मारेगाव येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय थांबवण्यासाठी गावातून नियमित एसटी बस सेवा त्वरित सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वतीने वणी आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
मौजे केगाव येथील अनेक विद्यार्थी रोज शिक्षणासाठी मारेगाव शहर व परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये ये-जा करतात. परंतु, सध्या गावातून विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार योग्य एसटी बस सेवा उपलब्ध नाही. यामुळे विद्यार्थ्यांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बस वेळेवर न मिळाल्याने विद्यार्थ्यांना महागड्या खासगी वाहनांचा किंवा इतर धोकादायक पर्यायांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक भार पडत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळेनुसार गावाला जोडणारी नियमित बस फेरी सुरू करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे. निवेदन देतेवेळी प्रवीण कळस्कर, धीरज पेचे, प्रफुल गाडगे, धीरज भगवा, सुनील टोंगे, त्याचबरोबर कलावती टोंगे, उमा पिंपळकर, पूजा ठावरी, दिपाली आवारी, सुनिता पानघाटे, नीलिमा पानघाटे, वैशाली मरसकोल्हे, दिशा लडके, गंगु टोंगे, रेणुका वासेकर, वैशाली ठावरी तसेच मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
“प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि सुरक्षेचा विचार करून तातडीने योग्य वेळापत्रकासह एसटी बस सुरू करावी. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, तसेच यादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास आगार प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील.”
👉 फाल्गुन गोहोकार (मनसे तालुकाध्यक्ष) वनी




