Home जिल्हा रस्त्याची चाळण, वर्षभरापासून बससेवा बंद; अकोला ग्रामस्थांचा संताप अनावर.

रस्त्याची चाळण, वर्षभरापासून बससेवा बंद; अकोला ग्रामस्थांचा संताप अनावर.

वरोरा :- वरोरा तालुक्यातील पारडी–अकोला–गिरोला मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने गेल्या वर्षभरापासून या भागातील एसटी बससेवा पूर्णपणे बंद आहे. प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल घेतली न गेल्याने अकोला येथील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. “आम्ही पारतंत्र्यात जगतोय की काय?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.



💥 पार्श्वभूमी व समस्येचे स्वरूप💥
अकोला हे वरोरा तालुक्यातील एक पुनर्वसित गाव आहे. पुनर्वसनानंतर सुमारे चाळीस वर्षांपूर्वी या गावासाठी वरोरा येथून बससेवा सुरू करण्यात आली होती, जी नंतर माकोना गावापर्यंत वाढविण्यात आली. मात्र, रस्त्याच्या खराब स्थितीचे कारण देत गेल्या वर्षापासून ही बससेवा बंद करण्यात आली आहे. सध्या बस सरळ पारडी ते माकोना धावत असल्याने अकोला गाव बसफेरीपासून पूर्णपणे वंचित झाले आहे.



💥 रस्त्याची बिकट अवस्था 💥

खड्ड्यांचे साम्राज्य :- पारडी–अकोला–गिरोला या अवघ्या तीन किलोमीटरच्या मार्गावर मोठे खड्डे पडले असून रस्त्याची गिट्टी पूर्णपणे उघडी पडली आहे.

अपघातांचा धोका :- खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे.
वेळेचा अपव्यय :-पारडी ते अकोला हे अवघे दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सध्या दहा ते बारा मिनिटे लागतात.
झाडे-झुडपे :- बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर झाडे-झुडपे सुद्धा वाढली आहेत.



💥 नागरिक व विद्यार्थी अडचणीत💥
ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड :- गावात सत्तर वर्षांवरील वीस ते पंचवीस ज्येष्ठ नागरिक आहेत. उपचारासाठी शेगावला जाताना त्यांना सकाळच्या बससाठी दोन किलोमीटर चालत पारडी गाठावे लागते. बस चुकल्यास त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. प्रवासादरम्यान अनेक ज्येष्ठ नागरिक पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

💥 विद्यार्थ्यांचे हाल :-शिक्षणासाठी शेगावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, संध्याकाळी परतीच्या प्रवासात त्यांना पायपीट करावी लागते.



💥  ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या 💥
1. पारडी–अकोला–गिरोला रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
2. अकोला गावची बंद झालेली बससेवा पूर्ववत सुरू करून ती अकोला येथेच मुक्कामी ठेवावी.
स्थानिक आमदार आणि खासदार यानी गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालून ग्रामस्थांची प्रलंबित असलेली ही समस्या त्वरित सोडवावी, अशी जोरदार मागणी अकोला ग्रामस्थांनी केली आहे.