वरोरा : शिक्षणासोबत एखादी कला आत्मसात केली तर ती आयुष्यभर माणसाच्या उपयोगी पडते. आज अनेक तरुण चित्रकला, ग्राफिक डिझाइन, भित्तीचित्रे, पोर्ट्रेट, डिजिटल आर्ट आणि विविध कलांच्या माध्यमातून स्वतःचा रोजगार निर्माण करत आहेत. त्यामुळे शिक्षणाबरोबरच कलेचेही महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याच्या उद्देशाने स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा संचालित लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, कॉलरी वॉर्ड वरोरा येथे प्रत्येक रविवारी मोफत चित्रकला वर्ग सुरू करण्यात आला असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
१ जुलैपासून या अभ्यास केंद्रात झोपडपट्टीतील गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम सुरू आहेत. त्यामध्ये वरोरा येथील कला शिक्षक सुजित वाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रविवारी चित्रकलेचा वर्ग भरत असून विद्यार्थ्यांना रेखाटन, रंगसंगती, कल्पनाशक्तीचा विकास आणि सर्जनशील विचारांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुजित वाटकर म्हणाले, कला ही केवळ छंद नसून ती उपजीविकेचे प्रभावी साधन आहे. शिक्षणाबरोबर एखादी कला आत्मसात केली तर आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या पायावर उभे राहता येते. म्हणूनच ‘कला माणसाला उपाशी मरू देत नाही’ असे म्हटले जाते.
यावेळी त्यांनी जागतिक कीर्तीचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. एकेकाळी चित्रपटांचे पोस्टर रंगविणारे हुसेन यांनी आपल्या कलेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. आजही अनेक युवक चित्रकला, डिजिटल डिझाइन, स्केचिंग आणि कलाविषयक विविध क्षेत्रांत करिअर घडवत आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत एखादी कला नक्की आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.
अभ्यास केंद्रात केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी ६ वाजता योग शिक्षिका शितल मिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत योगाभ्यास वर्ग घेतला जातो. त्यानंतर सायंकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत गोपाळ गुडधे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोकन इंग्लिशचे नियमित वर्ग भरतात. प्रत्येक रविवारी सुजित वाटकर यांच्या चित्रकला वर्गामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळत आहे.
योग, स्पोकन इंग्लिश आणि चित्रकला या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि कलागुण विकसित करण्याचा अभ्यास केंद्राचा प्रयत्न असून, झोपडपट्टीतील गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम वरोरा परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.




