Home विदर्भ एसटी महामंडळाच्या नाकर्तेपणावर ‘मनसे’ची चपराक; शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केली मोफत बस सेवा

एसटी महामंडळाच्या नाकर्तेपणावर ‘मनसे’ची चपराक; शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केली मोफत बस सेवा

वणी :- महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी ‘एसटी महामंडळ’ सध्या विविध कारणांमुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. ग्रामीण भागात वेळेवर बस न मिळणे, भंगार गाड्या आणि विद्यार्थ्यांच्या पासाचे रखडलेले प्रश्न यांमुळे सर्वसामान्य जनता आणि शाळकरी मुले हवालदिल झाली आहेत. सरकार आणि प्रशासनाच्या याच नाकर्तेपणावर जोरदार ताशेरे ओढत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला थेट कृतीतून आरसा दाखवला आहे. ‘सत्ताधिकारी करत नाहीत तर काय झालं, मनसे आहे ना!’ असा थेट आणि आक्रमक इशारा देत मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी थेट पाऊल उचलले आहे.




मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून अमित साहेब ठाकरे दत्तक योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांना प्रवासासाठी करावी लागणारी वणवण थांबवून सुरक्षितता मिळावी, म्हणून ‘चनोडा ते मारेगाव’ या मार्गावर विशेष ‘मोफत बस सुविधा’ सुरू करण्यात आली आहे.
मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण भागात बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या परंतु ह्या बसेस विद्यार्थ्यांच्या थांब्यावर थांबत नसून या कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते, त्यांना मनसेच्या या उपक्रमामुळे खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
या मोफत बस सेवेच्या उद्घाटनप्रसंगी आणि उपक्रमा दरम्यान मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मारेगाव तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, रोशन शिंदे, निखिल मेहता, आकाश खामणकर, ॲड. योगेंद्र तुराणकर यांच्यासह सर्व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मनसेच्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेतून जरी कौतुक होत असले, तरी यानिमित्ताने एसटी महामंडळ आणि राज्याच्या परिवहन विभागाच्या लक्तरा वेशीवर टांगल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवास देणे हे ज्या सरकारी महामंडळाचे मूळ कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. सरकारकडून ‘विद्यार्थ्यांना मोफत किंवा सवलतीचा प्रवास’ अशा केवळ मोठ्या आणि कागदी घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात मैलोन्मैल पायपीट करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल आजही कायम आहेत. जर एका राजकीय पक्षाला स्वखर्चाने किंवा स्वतंत्र योजनेतून विद्यार्थ्यांना बस द्यावी लागत असेल, तर कोट्यवधी रुपयांचा निधी आणि कर घेणारे एसटी महामंडळ नक्की करतेय काय? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
“एक हात विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी…” हे ब्रीदवाक्य घेऊन मनसे नेते राजू उंबरकर यांनी प्रशासनाला चपराक लगावत हे कार्य हाती घेतले आहे. राजकीय घोषणाबाजी आणि प्रशासकीय लालफितीच्या कारभारात सामान्य जनतेची होणारी फरफट या उपक्रमामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मनसेच्या या ‘मोफत बस सुविधे’मुळे चनोडा ते मारेगाव मार्गावरील विद्यार्थ्यांची सोय नक्कीच झाली आहे, पण या निमित्ताने एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत, हे मात्र नक्की! आता यावर परिवहन विभाग काही ठोस पावले उचलणार की नेहमीप्रमाणे डोळे झाकून बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.