Home राजकारण वरोरा: बेलगाव गावाची तहान भागवण्यात प्रशासन अपयशी; मनसेचा आंदोलनाचा इशारा.

वरोरा: बेलगाव गावाची तहान भागवण्यात प्रशासन अपयशी; मनसेचा आंदोलनाचा इशारा.

वरोरा :- वरोरा तालुक्यातील मौजा बेलगाव येथील ग्रामस्थ सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. ‘सनफ्लॅग आर्यन अँड स्टील‘ कंपनीच्या उत्खननामुळे परिसरातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली असून, याचा फटका थेट गावकऱ्यांना बसला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.




गेल्या काही काळापासून बेलगावमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या संदर्भात ११ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी महोदयांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली होती, ज्यात कंपनीला तात्पुरते आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, दोन महिने उलटूनही प्रशासनाच्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.




💠 पाणीपुरवठा समिती स्थापनेसाठी महिलांचा पुढाकार 💠
गावातील पाणी व्यवस्थापनासाठी महिलांनी आता कंबर कसली आहे. सौ. कुसुम वैद्य यांच्या नेतृत्वाखालील महिला सदस्यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, वरोरा यांच्याकडे विशेष ग्रामसभा आयोजित करून पाणीपुरवठा समिती गठित करण्याची लेखी मागणी केली आहे.
या प्रस्तावित पाणीपुरवठा समितीमध्ये खालील महिला सदस्यांचा समावेश असणार आहे:
सौ. कुसुम वैद्य, सौ. बेबी देठे, सौ. स्वाती झोडे, सौ. पल्लवी तुराणकर, सौ. कल्याणी तुर्के, सौ. महानंदा तुराणकर,  सौ. निशा जोगी, सौ. प्रविणा येवले,  सौ. लता गावंडे, सौ. उषा तुराळे, सौ. विद्या तुराळे




💠 प्रशासनाला इशारा 💠
“जर पाणीटंचाईची समस्या तातडीने निकाली काढली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना समस्त ग्रामस्थांना सोबत घेऊन अभिनव आंदोलन करेल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल,” असा स्पष्ट इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण वामनराव गेडाम यांनी दिला आहे.