वरोरा : स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था संचालित लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे रविवारी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयावरील विशेष मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले. या मार्गदर्शनासाठी वरोरा येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विवेक तेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी डॉ. तेला यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता, मानसिक आरोग्य, वेळेचे नियोजन आणि अभ्यासासोबत आरोग्याची योग्य सांगड कशी घालावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थीदशेत अंगीकारलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर उपयोगी पडतात, असे सांगत त्यांनी निरोगी आणि शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.
सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगल्या सवयीच यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहेत. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी खचून न जाता आत्मविश्वासाने आणि सकारात्मक विचारांनी पुढे जात राहा. निरोगी शरीर, निरोगी मन आणि चांगले संस्कार हीच विद्यार्थ्यांची खरी ताकद आहे, असा प्रेरणादायी संदेश डॉ. विवेक तेला यांनी विद्यार्थ्यांना दिला.अभ्यास केंद्राच्या नियमित उपक्रमानुसार कार्यक्रमापूर्वी योगाभ्यास व प्रार्थना घेण्यात आली.यावेळी संस्थेचे सचिव आशिष घुमे, गुरुदेव सेवा मंडळाच्या कांता उमरे तसेच संस्थेचे स्वयंसेवक चेतन बुरडकर उपस्थित होते.




