Home क्राईम वरोरा पोलिसांचा तडाखा: बसमध्ये चोरी करणाऱ्या महिला टोळीला २४ तासांत बेड्या; लाखो...

वरोरा पोलिसांचा तडाखा: बसमध्ये चोरी करणाऱ्या महिला टोळीला २४ तासांत बेड्या; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!

(प्रतिनिधी लखन केशवानी)  वरोरा :- बसमध्ये चढताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याची पोत आणि रोख रक्कम चोरणाऱ्या महिला टोळीला वरोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली असून, वरोरा पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




दिनांक १ जुलै २०२६ रोजी फिर्यादी श्रीमती कल्याणी श्रीकांत जांभूळकर (रा. टाकळघाट, जि. नागपूर) या वरोरा येथील रत्नमाला चौकातून नागपूरला जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. याच वेळी दोन अज्ञात महिलांनी संधी साधून त्यांच्या पर्समधून २० ग्रॅम सोन्याची पोत (किंमत २,८२,५०० रुपये) आणि २५०० रुपये रोख असा एकूण २,८५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बसमधून उतरल्यावर चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तात्काळ वरोरा पोलीस स्टेशन गाठले.




💠 पोलीस यंत्रणा सक्रिय, २४ तासांत निकाल 💠
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी त्वरित एक विशेष तपास पथक तयार केले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नागपूर येथील दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले.




💠 आरोपींची माहिती 💠
१) नन्नू रोहित दुन्गो (वय २६, रा. नागपूर)
२) उषा राजू मानकर (वय २०, रा. नागपूर)
चौकशीदरम्यान या दोन्ही महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी गेलेली २,८२,५०० रुपयांची सोन्याची पोत आणि २५०० रुपये रोख रक्कम पूर्णपणे जप्त केली आहे.




💠 पोलिसांच्या तत्परतेचा विजय 💠
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, सपोनी शरद भसमे, मपोउपनी सुमित्रा साखरकर तसेच पोलीस कर्मचारी विशाल राजुरकर, सौरभ कुलते, महेश गाव्तुरे, सुखराज यादव, संदीप मुळे, प्रशांत नागोसे, अमोल नवघरे आणि मनोज ठाकरे यांच्या पथकाने पार पाडली.
वरोरा पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रवाशांच्या मनातील भीती कमी झाली असून, गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.