नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी एक विशेष पत्र लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशाची सुरुवात करताना त्यांनी “हर हर महादेव! जय बाबा बर्फानी!” असा जयघोष करत सर्व शिवभक्तांना यात्रेसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रेत सहभागी होणे हे प्रत्येक शिवभक्तासाठी मोठे सौभाग्य आहे. दरवर्षी लाखो भाविक या दिव्य यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि बाबा बर्फानींचे दर्शन घेणे ही एक अत्यंत पवित्र आणि अविस्मरणीय अनुभूती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
💠 यात्रेकरूंसाठी पाच महत्त्वपूर्ण संकल्प 💠यावेळी पंतप्रधानांनी यात्रेकरूंना पाच महत्त्वपूर्ण संकल्प करण्याचे आवाहन केले आहे:
💠 सुरक्षा आणि नियमांचे पालन 💠प्रशासनाचे आदेश, वाहतूक नियम आणि सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच, पावसामुळे निसरडे होणारे रस्ते आणि थंडी यांबाबत विशेष दक्षता घेण्याची सूचना केली.
💠 स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी 💠’व्होकल फॉर लोकल’चा संदेश देत, प्रवासाच्या खर्चातील किमान १० टक्के रक्कम स्थानिक उत्पादने खरेदी करण्यासाठी खर्च करण्याचे आवाहन केले. यामुळे जम्मू-काश्मीरमधील कुटुंबे आणि युवकांच्या उपजीविकेला बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
💠 पर्यावरण संवर्धन 💠 :-रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहीण किंवा भावाला एक रोपटे भेट देण्याचे आणि ‘आईच्या नावाने एक वृक्ष’ हे अभियान पुढे नेण्याचा संदेश त्यांनी दिला.
💠 राष्ट्र प्रथम 💠वर्षभर ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना जोपासत आपली कर्तव्ये पार पाडण्याचे आणि विकसित भारताच्या उभारणीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
💠 भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक 💠
पंतप्रधान मोदींनी अमरनाथ यात्रेला भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचे म्हटले आहे. ही यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगभरातून येणाऱ्या भाविकांना जोडते, जे भारताच्या विविधतेतील एकतेचे जिवंत उदाहरण आहे. तसेच, यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री अमरनाथजी तीर्थक्षेत्र मंडळ, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि लष्कर, निमलष्करी दले, पोलीस, आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
शेवटी, बाबा अमरनाथ यांच्या कृपेने सर्व यात्रेकरूंची यात्रा सुरक्षित आणि आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण होवो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी व्यक्त केली.




