Home Breaking News वरोरा हादरले! लाखो रुपयांची फसवणूक; एसबीआय ग्राहक सेवा केंद्र चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

वरोरा हादरले! लाखो रुपयांची फसवणूक; एसबीआय ग्राहक सेवा केंद्र चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

वरोरा :- आर्थिक फसवणुकीच्या विळख्यात अडकलेल्या एका एसबीआय ग्राहक सेवा केंद्र चालकाने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पांडुरंग दत्तू गावंडे (४५) असे या दुर्दैवी व्यावसायिकाचे नाव असून, या घटनेने वरोरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.




गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग गावंडे यांनी वरोरा तालुक्यातील कोटबाळा येथील स्वतःच्या शेतात जाऊन विष प्राशन केले. सुदैवाने, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना त्वरित वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.




💠 सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासे 💠
गावंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये फसवणूक करणाऱ्यांचा बुरखा फाडला आहे. ‘माहिती पत्रक’ या नावाने लिहिलेल्या या चिठ्ठीत त्यांनी आपल्यावर ओढवलेल्या भीषण आर्थिक संकटाचे खापर काही विशिष्ट व्यक्ती आणि संस्थांवर फोडले आहे.




💠 कोणी केली फसवणूक 💠
👉  बाभणी येथील एका व्यक्तीने ‘स्मार्ट मीटर’ प्रकल्पाच्या नावाखाली ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली.
👉  चंद्रपूर येथील एका इसमाने नोकरी लावून देण्याच्या नावाखाली मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे.
👉  ‘फार्मर प्रोड्युसर कंपनी’मध्ये काम करताना स्वतःचे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
👉  बाजारात आणि इतर लोकांकडे त्यांची सुमारे ७४ लाख रुपयांची उधारी अडकली असून, लोकांनी पैसे परत करण्यास नकार दिल्याने ते तीव्र मानसिक आणि आर्थिक तणावात होते.




💠 माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला 💠
“आज ना उद्या सर्व ठीक होईल, या आशेवर मी जगत होतो. पण माझ्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. आपल्या पश्‍चात फसवणूक करणाऱ्यांकडून हक्काची रक्कम वसूल करून ती आपल्या कुटुंबाला परत मिळावी, अशी अखेरची इच्छा त्यांनी चिठ्ठीत व्यक्त केली आहे.
सध्या या प्रकरणी वरोरा पोलीस अधिक तपास करत असून, फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.