वरोरा :- कृषी उत्पन्न बाजार समिती, वरारा अंतर्गत असलेल्या माढेळी उपबाजार समितीला ‘SSFM Pvt. Ltd.’ कंपनीकडून भाड्याच्या स्वरूपात नियमित उत्पन्न मिळत असतानाही, तिथे येणाऱ्या बळीराजाच्या नशिबी मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधत माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन धात्रक यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी तातडीने निधी खर्च करण्याची मागणी केली आहे.
💠 शेतकरी सुविधांपासून वंचित का ?💠
उपबाजार समिती माढेळी येथे गोडावून, बैल बाजार रशीद आणि शेण खताच्या माध्यमातून समितीला नियमित भाडे उत्पन्न मिळत आहे. हे उत्पन्न शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी खर्च होणे अपेक्षित असताना, ते कुठे खर्च होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी प्राथमिक गरजांची वानवा असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
💠 माजी सैनिकांच्या मागण्या 💠
सचिन धात्रक यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात बाजार समिती आवारात खालील सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची आक्रमक मागणी केली आहे:
💠 शेतकऱ्यांसाठी विश्रांती (शेड) व्यवस्था.
💠 पिण्यासाठी थंड (Chilled RO) पाण्याची सोय.
💠 बसण्यासाठी टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था.
💠 कॅन्टीन सुविधा आणि स्वच्छ प्रसाधनगृहे.
💠 जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय.
या सुविधा मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि बाजार समितीची कार्यक्षमताही वाढेल, असे मत धात्रक यांनी व्यक्त केले आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल कधी घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




