Home Breaking News राजुरा येथील ‘देशपांडे वाडी’चा प्रलंबित प्रश्न मार्गी; सर्व्हे क्र. १ ते ८...

राजुरा येथील ‘देशपांडे वाडी’चा प्रलंबित प्रश्न मार्गी; सर्व्हे क्र. १ ते ८ मधील प्लॉट धारकांना मिळाला ‘वर्ग-१’ चा मालकी हक्क

राजुरा :- राजुरा येथील देशपांडे वाडी परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सर्व्हे क्रमांक १ ते ८ मधील प्लॉट धारकांचा मालकी हक्काचा प्रश्न आमदार देवराव भोंगळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर मार्गी लागला आहे. येथील सर्व प्लॉट्सचे ‘भोगवटादार वर्ग-२’ मधून विनामूल्य ‘वर्ग-१’ मध्ये रूपांतरित करण्यात आले असून, काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात नागरिकांना सुधारित ७/१२ चे वितरण करण्यात आले.
💠 काय होता प्रश्न💠
देशपांडे वाडीतील सर्व्हे क्रमांक १ ते ८ मधील प्लॉट हे ‘भोगवटादार वर्ग-२’ मध्ये समाविष्ट होते. या तांत्रिक अडचणीमुळे प्लॉट धारकांना जमिनीची खरेदी-विक्री करताना, बँकेकडून कर्ज घेताना किंवा इतर कायदेशीर प्रक्रियांमध्ये मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. नागरिकांची ही अडचण ओळखून आमदार देवराव भोंगळे यांनी या विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा केला.
आमदार देवराव भोंगळेंच्या पाठपुराव्याला यश
या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी महसूलमंत्री मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्तरावर मंत्रालयात वेळोवेळी बैठका घेतल्या. तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने या सर्व्हे क्रमांकांमधील प्लॉट ‘वर्ग-२’ मधून ‘वर्ग-१’ मध्ये रूपांतरित करण्यास विनामूल्य मंजुरी दिली. या निर्णयामुळे आता प्लॉट धारकांना जमिनीवर पूर्ण मालकी हक्क प्राप्त झाला असून, खरेदी-विक्रीचा मार्ग कायमचा मोकळा झाला आहे.
 👉  नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
सुधारित ७/१२ चे वितरण होताच देशपांडे वाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हा सोहळा आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी तहसीलदार ओमप्रकाश गोंड, भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, भाजपा नेते राधेश्याम अडानिया, विनोद नरेंदूलवार, सचिन भोयर, प्रफुल कावळे, भूपेश मेश्राम, अमोल चिल्लावार, मयुरी पहानपटे, स्वप्नील पहानपटे, आकाश गंधारे, पुरुषोत्तम गंधारे, प्राचार्य संभाजी वारकड, अँड. सदानंद लांडे, भास्कर ठावरी यांच्यासह शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने देशपांडे वाडीतील नागरिक उपस्थित होते.