चंद्रपूर :- जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल असलेल्या घोडनकप्पी गावात रस्ते नसल्यामुळे एका २५ वर्षीय गरोदर मातेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
संगिता तुळशीराम गेडाम या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावात बारमाही रस्ता नसल्यामुळे त्यांना डोंगरातून आणि पाऊलवाटांनी प्रवास करावा लागला. रुग्णवाहिका जिथपर्यंत पोहोचू शकत होती, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कठीण प्रवास करावा लागला आणि वाटेतच त्यांची प्रसूती झाली. बाळ जन्माला आले, परंतु त्यानंतर संगिता यांची प्रकृती खालावली आणि अतिरक्तस्राव होऊन उपचाराअभावी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
💠 पतीची आर्त हाक 💠
पत्नीच्या निधनाने दु:खी झालेले पती तुळशीराम गेडाम यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “रस्ता असता तर माझी पत्नी वाचली असती. आम्हाला आता आश्वासने नकोत, तर कायमस्वरूपी रस्ता हवा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
💠 प्रशासनाच्याक्ष उदासीनतेवर प्रश्नचिन्ह 💠
स्थानिक नागरिकांनी रस्त्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला आहे, निवेदने दिली आहेत आणि आंदोलनेही केली आहेत. मात्र, तरीही प्रश्न प्रलंबित आहे. आजारी व्यक्ती असो किंवा गरोदर महिला, प्रत्येक वेळी त्यांना जीव धोक्यात घालून डोंगरातून प्रवास करावा लागतो. या दुर्घटनेमुळे प्रशासनाच्या विकासकामांच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आता तरी जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.




