Home Breaking News बाळूभाऊ धानोरकरांच्या स्मृतींना उजाळा: वरोरात कार्यकर्त्यांकडून आदरांजली; जनसेवेचा संकल्प दृढ

बाळूभाऊ धानोरकरांच्या स्मृतींना उजाळा: वरोरात कार्यकर्त्यांकडून आदरांजली; जनसेवेचा संकल्प दृढ

वरोरा :- बाळूभाऊ धानोरकरांच्या स्मृतींना उजाळा वरोरात कार्यकर्त्यांकडून आदरांजली; जनसेवेचा संकल्प दृढ लोकनेते स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आज वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आदरांजली सभेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी स्व. बाळूभाऊंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
जनतेचा आवाज, संघर्षमय नेतृत्व
स्व. बाळूभाऊ धानोरकर यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे सामान्य जनतेचा बुलंद आवाज आणि अन्यायाविरुद्धचा लढा होता. बाळूभाऊंच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या स्मृतीसभेत त्यांच्या कार्याची आठवण काढताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. बाळूभाऊंचे जनतेप्रती असलेले अढळ समर्पण, संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व आणि लोकसेवेची त्यांची अखंड तळमळ आजही असंख्य कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे.
विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार
“बाळूभाऊ केवळ एक नेते नव्हते, तर ते प्रत्येक सर्वसामान्यांचे आधारस्तंभ होते,” अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या निधनानंतरही त्यांनी लावलेले समाजसेवेचे रोपे वटवृक्ष बनवण्याचा आणि त्यांच्या विचारांचा वारसा अधिक ताकदीने पुढे नेण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्या कार्याचा हा वारसा वरोरा आणि परिसराच्या विकासासाठी अधिक दृढनिश्चयाने पुढे नेला जाईल, असा पुनरुच्चार उपस्थितांनी केला.
या आदरांजली सभेत अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि स्व. बाळूभाऊंच्या कार्यावर श्रद्धा असणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.